सिंधुदुर्गनगरी ता १७
राज्यातील कामगारांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कामगार एकवटले असून या कामगारांनी आज भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. तसेच विविध गगनभेदी घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्र वेतन कोड २०१९ त्वरित लागू करण्यात यावा, सामाजिक सुरक्षा कोड २०१९ लागू करण्यात यावा, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज सुरू करण्यात यावे, राज्यातील अंगणवाडी कर्मचारी व आशा कर्मचारी यांना किमान वेतन लागू करण्यात यावे, कामगार राज्य विमा योजना सुविधेची अंमलबजावणी करण्यात यावी, कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णवेळ सरकारी कामगार अधिकारी देण्यात यावा, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित आर्थिक लाभाचे प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावे, ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली नियमांमध्ये वारंवार बदल करून कामगारांची ऑनलाईन नोंदणी साठी होणारी लुबाडणूक थांबावी, ई श्रम नोंदणी अभियान पूर्ण करण्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात यावे, कोव्हिड १९ ची असंघटित कामगारांना देय असलेली आर्थिक मदत देण्यात यावी आदी विविध मागण्यांकडे शासनाचे वेळोवेळी लक्ष वेंधण्यात आले होते. मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याचे भारतीय मजदूर संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष विकास गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघाचे सचिव सत्यजित जाधव, सुधीर ठाकूर, अशोक घाडी, राजेंद्र आरेकर, नंदू झाड, महेश सुर्वे, ओमकार गुरव यांच्याशी शेकडोच्या संख्येने कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच या मोर्चाला बांधकाम कामगार महासंघाने सक्रिय पाठिंबा देत या मोर्चात आपला सहभाग घेतला .
*विविध घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दुमदुमली!
कामगार एकजुटीचा विजय असो, हमारी युनियन हमारी ताकद, भारतीय मजदूर संघाचा विजय असो, वंदे मातरम् आदी विविध गगनभेदी घोषणा देत हा मोर्चा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी उपस्थित कामगारांनी विविध प्रकारच्या घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला.
*पोलीस बंदोबस्त तैनात
कामगार संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी सकाळपासून पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
