मनीषा परब : प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
⚡बांदा ता.१७-: आरोस-धनगरवाडी ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी सुस्थितीत असा रस्ता उपलब्ध नाही. तसेच नळयोजना, वीज समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब यांच्याकडे केली. रस्ता व पाण्यासंबंधी कामे मंजूर असून ती पावसाळ्यानंतर लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे आश्वासन आरोस मनीषा परब यांनी ग्रामस्थांना दिले.
बाळा परब आणि विजय सोनावळे मित्रमंडळ यांच्याकडून आरोस धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सौ. परब बोलत होत्या. व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, ग्रामस्थ चंद्रकांत घोगळे, शालेय समिती अध्यक्ष मंगेश येडगे, शिक्षक श्री.वरक, दर्शना परब, समिधा आरोसकर तसेच धनगरवाडी ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीलेश परब म्हणाले की, शैक्षणिक साहित्याचा योग्यप्रकारे वापर विद्यार्थ्यांनी करावा. शैक्षणिक बाबतीत कोणतीही अडचण आल्यास आपणास संपर्क साधा असे सांगत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ग्रामस्थांनी शाळेच्या स्वच्छतागृहाची समस्या असल्याचे सौ. परब यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सरपंचांशी चर्चा करून लवकरात लवकर स्वच्छतागृहाची सोय करू असे आश्वासन सौ. परब यांनी ग्रामस्थांना दिले. शिक्षक श्री.वरक यांनी आभार मानले.
