“त्या” आश्वासनानंतर देखील त्या दोन्ही संस्था उपोषणावर ठाम…

मालवण (प्रतिनिधी)
आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी दि. १४ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन व शिवशक्ती जलपर्यटन चालक मालक विविध सेवा सहकारी संस्था या दोन्ही संस्थांनी दिल्यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी याबाबत मेरीटाइम बोर्डाचे लक्ष वेधून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देत उपोषण स्थगित करावे अशी विनंती या दोन्ही संस्थांना लेखी पत्राद्वारे केली आहे. मात्र, जो पर्यंत योग्य कार्यवाही होत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,१४ ऑगस्ट पासून व्यावसायिकांच्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषणास बसण्यावर दोन्ही संस्था ठाम आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबईकडून ऑनलाईन सर्व्हे प्रमाणपत्र व्यावसायिकांना वेळेत न मिळाल्यामुळे सर्व बाबींची पूर्तता करूनही आम्ही अनधिकृत दिसत असल्याने त्यावर योग्य निर्णय होऊन स्थानिक पातळीवर सर्व्हे प्रमाणपत्र मिळावे किंवा नौकेचा सर्व्हे झाल्यावर त्याच जुन्या सर्व्हे प्रमाणपत्रावर त्वरित सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्याने ऑफलाईन नूतनीकरण करून द्यावे मालवण बंदराची क्षमता निश्चित करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर कार्यरत असलेल्या संस्थांकडून नवीन परवानगी मागणाऱ्यास त्या संस्थेचा अनुभवाचा दाखला किंवा ना हरकत घेणे अनिवार्य केले जावे, बंदर विभागाकडून २५ मे पर्यंत किल्ला प्रवासी वाहतुकीस परवानगी दिलेली असते. तरीही हवामानाचा अंदाज घेऊन स्थानिक बंदर अधिकाऱ्यांना प्रवासी वाहतुकीस मुदतवाढ देण्याचे अधिकार असावेत यासह अन्य मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास दि १४ ऑगस्ट रोजी १५० कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत आणि शिवशक्ती जलपर्यटन चालक-मालक विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप आचरेकर या दोन्ही संस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते

किल्ला होडी व्यावसायिक संस्थेच्या या मागणीवर प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी या दोन्ही संस्थांना पत्र पाठवले आहे. दोन्ही संस्थांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबई यांना कळविण्यात आले असून त्यांच्या परवानगीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. मात्र यावर दोन्ही संस्थांनी असमाधान व्यक्त करत जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण स्थगित केले जाणार नाही, १४ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत असा इशारा सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page