⚡मालवण ता.१३-: ब्रेस्ट कँसर हा आजार बरा होत नाही ही भीती महिलांनी मनातून काढून टाकली पाहिजे. लवकर व योग्य निदान आणि चांगले उपचार यामुळे कँसरचा आजार १०० टक्के बरा होऊ शकतो. आज मालवण मध्ये आरोग्य विषयक चांगले काम होत असून रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर एक महत्वाची भूमिका बजावत आहे. ब्रेस्ट कँसरचे वाढते रुग्ण बघता कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मार्फत मालवणात रेडकर हॉस्पिटल येथे ब्रेस्ट कँसर सेंटर उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे चान्सलर डॉ. सुरेश भोसले यांनी येथे बोलताना केले.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्ट, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि लायन्स क्लब मालवण यांच्या सहयोगाने मालवण दैवज्ञ भवन येथे आयोजित मोफत ब्रेस्ट कँसर तपासणी आणि उपचार शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे चान्सलर डॉ. सुरेश भोसले, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, कृष्णा इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपल डॉ. वैशाली मोहिते, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शमिका बिरमोळे, लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, श्री. नानिवडेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. विवेक रेडकर यांनी प्रास्ताविक करत ब्रेस्ट कँसर आजाराचे गांभीर्य स्पष्ट करत रेडकर हॉस्पिटल मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच डॉ. सुरेश भोसले यांचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, देशात नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य दिले असून हा देश सुदृढ नागरिकांचा देश बनला पाहिजे. आज आयोजित केलेले ब्रेस्ट कँसर तपासणी व उपचार शिबीर यापूढेही सुरू ठेवावे. महिला ही घरातील सर्वांचे आरोग्य बघत असते त्याप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित तपासणी केली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बारा स्त्रियांमागे एका स्त्री ला ब्रेस्ट कँसर होतो. या आजाराचे निदान लवकर झाले पाहिजे. ५० व्या वयानंतर महिलांनी याबाबत तपासणी करून घेतली पाहिजे. शरीरावर एखादी गाठ आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, जी गाठ दुखत नाही त्याचीच त्वरित तपासणी करून घ्यावी, बदलती जीवनशैली हे देखील कँसर होण्याचे एक कारण आहे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे महत्वाचे आहे, असेही डॉ. भोसले म्हणाले.
यावेळी तारकर्ली गावात ब्रेस्ट कँसर बाबत ९० महिलांची तपासणी करण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल सरपंच सौ. स्नेहा केरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती तोरसकर यांनी केले. यावेळी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, लायन्स क्लब सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, भाजप महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. शिल्पा खोत, प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, प्रा. सुमेधा नाईक, सौ. पल्लवी खानोलकर, डॉ. गार्गी ओरसकर यांसह ब्रेस्ट कँसर तपासणी साठी आलेल्या बहुसंख्य महिला, उपस्थित होत्या.
