पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले

खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट

⚡कणकवली ता.१३-: महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत आहेत. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. भाडोत्री लोकांना घेण्यापेक्षा वैभव नाईक हे सिंधुदुर्गचे वैभव आहेत तेच आमदार होणार असे स्पष्ट करुन उदय सामंत यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, बाळा गावडे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, बाळा भिसे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,देवगड तालुकाप्रमुख जयेश नर,रामू विखाळे,हर्षद गावडे,उप जिल्हा प्रमुख नंदू शिंदे, सुजित जाधव,राजू राणे, राजू राठोड,कन्हैया पारकर,कणकवली शहर प्रमुख उमेश वाळके, मीनल तळगावकर,वर्षा पवार,विदेही गुडेकर,स्वरूपा विखाळे आदि उपस्थित होते.
खा. राऊत पुढे म्हणाले, सामंत पालकमंत्री असताना किती टक्केवारी घ्यायचे हे सर्वज्ञात आहे. वॉटर प्युरिफायर घोटाळ्यातील चौकशी अहवालात त्यांच्या स्विय सहाय्याचे नाव होते.शिवसेनेने आवाज उठवूनही याची पारदर्शक चौकशी झाली नाही. मात्र या घोटाळ्यातील सहभागी असलेल्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जि. प. मतदारसंघामध्ये प्रत्येकी २ हजाराची नोंदणी व्हायलाच हवी. सिंधुदुर्गात अतिरिक्त विमान सोडावे,यासाठी मी मंत्री ना.ज्योतीरादित्य सिंधीया यांच्याकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत.असेही राऊत म्हणाले.

              यावेळी गौरीशंकर खोत म्हणाले, सध्याचे संकट शिवसेनेवर नसून महाराष्ट्रावर आहे. जिल्ह्यात उदय सामंत, दीपक केसरकर, नारायण राणे व भाजप अशी चार संकटे आहेत. पण, कितीही संकटे आली तरी शिवसेना मोठी होत गेली. म्हणूनच मोदी- शहा यांनी शिवसेना फोडली. आज बंडखोरांकडून प्रती शिवसेना भवन उभारणार असल्याचे सांगितले जात आहे.त्याचे आपण कबरीमध्ये रुपांतर करूया असे त्यांनी सांगितले.

      अरुण दुधवडकर म्हणाले ,शिवसेना सोडून गेलेले गद्दार शिवसेना आमची, चिन्ह आमचे  बाळासाहेबांचे  आम्ही शिवसैनिक अशा वल्गना करत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या  शपथ विधी वेळी यातील एकानेही बाळासाहेबांचे नाव घेतले नाही. यावरून यांचे शिवसेना प्रेम दिसून येते. एकनाथ शिंदे या सतांतराला  क्रांती म्हणत असले तरी गावागावात यांना कोण चांगले म्हणत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेना सोडली उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले आहे. मात्र सर्व शिवसैनिकांनी मिळून शिवसेना पुन्हा जोमाने वाढवायची आहे. यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गावागावात जावून  लोकांना भेटा त्यांची कामे करा व जास्तीत जात शिवसेना सदस्य नोंदणी करा असे आवाहन त्यांनी केले. 

   आ. वैभव नाईक म्हणाले,मागील काही दिवसांतील घडामोडीत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहीले तेच कट्टर शिवसैनिक आहेत. वास्तविक पक्षात फुट पडली असली तरी अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे. यापूर्वी केसरकर, सामंत यांच्या मंत्रीपदाचा आपणाला किती फायदा झाला हे सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक मी कुडाळ मालवणमधून उभा राहीलो तेव्हा टेबल लावायला देखील कार्यकर्ते नव्हते, तरीही जिंकलो.आता तर तशी परिस्थिती नाही आपण सर्वानी मेहनत घेऊन येणाऱ्या निवणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे.गरज लागेल तिथे मी आपल्या पाठीशी राहीन. जोमाने कामाला लागा. लोकांशी संपर्क वाढवा असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी प्रदीप बोरकर, सतीश सावंत,संजय पडते,संदेश पारकर,अतुल रावराणे,बाळा गावडे,नीलम पालव यांनीही शिवसेना संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page