जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा मंगळावर १६ ऑगस्ट रोजी…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने गेली सात वर्षे आयोजित केली जाणारी सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव असणारी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा मंगळवार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता भरड दत्तमंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.

नारळी पौर्णिमा निमित्ताने होणारी ही स्पर्धा जोरदार पाऊस व वारे यामुळे स्थगित करण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून काही दिवस पावसाची शक्यता असल्याने भरड दत्तमंदिर येथील पटांगण परिसरात स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या गजरात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

अस्सल सोन्याची चार नाणी, सोन्या चांदी पासून बनवलेला आकर्षक नारळ, सोन्याची नथ, चांदीचे दिवे, पैठणी असा लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केली जाणार आहे. अशी माहिती आयोजक शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या वतीने देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी महिला नारळ लढवणे स्पर्धा अशी ओळखप्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला स्पर्धकांची नाव नोंदणी होत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील पाच महिलांचा प्रातिनिधिक सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे. अशी माहिती शिल्पा खोत यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page