सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई राहणार उपस्थित
ओरोस ता.१३-:
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीचे उद्घाटन रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विधी सेवा प्राधिकरणच्या विधी सेवा सदन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद येथील न्यायालयाच्या प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या दीपक म्हालटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हा बार अससिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिल उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, ऍड उमेश सावंत, ऍड अमोल सावंत, यतिश खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी न्या. म्हालटकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीचे उद्घाटन रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष न्या. प्रसन्न वराळे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती न्या. प्रकाश देसाई, जिल्हा प्रधान न्यायाधीश व विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. एस व्ही हांडे, जिल्ह्यातील विधीज्ञ आदी उपस्थित राहणार आहेत. १ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद या इमारतीसाठी करण्यात आली होती. या इमारतीमध्ये तळमजल्यावर विधी सेवा प्राधिकरण चे ऑफिस असणार असून पहिला मजल्यावर समुपदेशन कक्ष, सभागृह, प्रायव्हसी हॉल यांचा समावेश असल्याची माहिती न्या. म्हालटकर यांनी दिली.
या इमारतीच्या उद्घाटन साठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे येणार असून इमारतीच्या उद्घाटनाला न्यायमूर्ती येणे ही पहिलीच वेळ असून ती जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील वकिलांच्यावतीने त्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले. तर या इमारती मध्ये अनेक प्रलंबित प्रकरणावर समझोता केला जाणार आहे यासाठी पक्षकारांना चर्चा स्वतंत्र रूम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार असल्याचे ॲड. राजेंद्र रावराणे यांनी सांगितले.
