मालवण नगरपालिकेच्या इकोब्रिक्स स्पर्धेत महेंद्र पराडकर, वेदांत नाईक, भूषण मेतर विजेते

⚡मालवण ता.१३-; प्लास्टिकवर बंदी बाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण- इकोब्रिक्स स्पर्धेत पत्रकार महेंद्र पराडकर यांनी प्रथम तर विद्यार्थी वेदांत नाईक याने द्वितीय व पत्रकार भूषण मेतर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह तेथे आयोजित सन्मान सोहळ्यात या तिन्ही विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिक मुक्ती बाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून इकोब्रिक्स या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांची प्लास्टिक आवरणे यासह इतर प्लास्टिक जन्य कचरा प्लास्टिक बॉटल मध्ये भरून त्या बॉटल म्हणजेच ब्रिक्स नगरपालिकेकडे जमा करावयाचे होते. या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, शहरातील सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी आदीनी सहभाग दर्शविला होता.

मालवण नगरपालिकेतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्लास्टिक कचरा समस्येवर आयोजित चर्चासत्र व सन्मान सोहळ्यात इकोब्रिक्स स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी विजेते महेंद्र पराडकर, वेदांत नाईक, भूषण मेतर यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, तज्ज्ञ मार्गदर्शक व पर्यावरण अभ्यासक अनिल चौगुले, जिल्हा व्यापारी संघाचे नितीन वाळके, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, पूजा करलकर, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, प्रा. लेफ्टनंट एम. आर. खोत, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत, गिरीश कुशे, नगरपालिकेचे अभियंता सुधाकर पाटकर, शहर समन्वयक निखिल नाईक आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

You cannot copy content of this page