गणेश चतुर्थीपुर्वी वीज पुरवठा सुरळीत करा

अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही;काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.१२-: तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेले कित्येक दिवस सुरु असलेला विजेचा लपंडाव याला महावितरणाचे अधिकारी जबाबदार असून गणेश चतुर्थी पुर्वी वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे.

तर कायद्याचा धाक दाखवून ग्राहकांना उद्धट उत्तरे दिल्यास गाठ आमच्याशी आहे असेही श्री सांगेलकर यांनी सांगितले.
श्री सांगेलकर यांनी याबाबत असे म्हटले की,काही ठिकाणी सावंतवाडी तालुक्यामध्ये गेले कित्येक दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पावसाळ्यात वीज सुरळीत राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक कामाकडे लाईनमन वायरमन दुर्लक्ष करत असल्याने आणि अधिकारी वर्गाचा त्याच्यावर अंकुश नसल्याने सद्यस्थितीत असे प्रकार घडत आहे लाईनवर आलेली झाडी तसेच अन्य कामे पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असते मात्र ही कामे दिखाऊपणाची केली जातात परिणामी पावसाळ्यात बत्ती गुल होण्याचे प्रकार सर्रास घडतात. तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विजेचा लपंडाव त्याचाच एक भाग आहे त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करुन आगामी गणेशोत्सव सणापूर्वी विजेची समस्या दूर करावी अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.
त्यांनी म्हटले की ग्रामीण भागात तसेच शहरात गणपती शाळांमध्ये गणपती मूर्ती घडवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु वारंवार जाणाऱ्या विजेमुळे त्यांच्या कामामध्ये विघ्न निर्माण होत आहे, आपल्याकडे बऱ्याच गणेशमूर्तीकरांनी फोन करुन कैफियत मांडली आहे, विज अधिकाऱ्यांना फोन केला असता उडवा उडवीची उत्तरे त्याच्याकडून मिळतात असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्याचा धाक दाखवून किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊन पळवाटा काढण्याचा प्रयत्न झाल्यास कॉग्रेस पक्ष गप्प बसणार नाही असा इशारा सावंतवाडी तालुका कॉग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे .

You cannot copy content of this page