⚡सावंतवाडी ता.१२-: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्यात एकमत नसल्यामुळे मळगाव घाटीतील धोकादायक झाडांचा प्रश्न जैसे थे आहे, काल झालेला प्रकार लक्षात घेता धोकादायक झाडे तोडा अन्यथा दुदैवाने एखादा अपघात घडल्यास त्यांला दोन्ही विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील , असा इशारा वेत्ये उपसरपंच तथा युवा सेनेचे पदाधिकारी गुणाजी गावडे यांनी दिला आहे. काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मळगाव घाटीतील झाडे चार ते पाच ठिकाणी कोसळली होती. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. काळीवेळ वाहतूक ठप्प झाली.
परंतु प्रवाशी व वाहन चालकांनी पुढाकार घेऊन ती झाडे बाजूला केली या पार्श्वभूमीवर श्री. गावडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की , येथील मळगाव घाटीतील झाडे दिवसेंदिवस धोकादायक होत आहेत. ती तोडण्यात यावी, अशी मागणी गेले अनेक दिवस सुरु आहे. मात्र याकडे वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेंकाकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत दोन्ही विभागांनी संयुक्त बैठक घेत याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा युवा सेनेच्या माध्यमातून आंदोलन करु,असा इशारा गावडे यांनी दिला आहे.
