मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांची ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे भजने सादर
⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला.
गुरुवार सकाळपासून हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त रवळनाथाची मूर्ती सुशोभित वस्त्र घालून नटविण्यात आली होती. भाविकांनी सकाळपासून गर्दी करून श्री देव रवळनाथाचे दर्शन घेतले. यावेळी देवाला केळी, नारळ ठेऊन नवसफेड करण्यात आली. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, श्री देव रवळनाथ देवावर अभिषेक, होमहवन, मंत्रपठण, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम ब्राम्हणांच्या साक्षीने पार पडले. तसेच यनिमित्त सकाळपासून मळगाव येथील तळकटकरवाडी, पाडगावकरवाडी, सुतारवाडी, खालची देवूळवाडी, कुडववाडी, तेलकाटावाडी, सावळवाडा, नाईकवाडी, बांदेकरवाडी, जोशी मांजरेकरवाडी, कुंभारआळी, वरची देवूळवाडी, कुंभारवाडी आदी स्थानिक भजनमंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे सुश्राव्य भजने सादर केली. या भजनांचा मळगावातील भजनप्रेमींनी लाभ घेतला. आज शुक्रवार सकाळी भव्य अशी दिंडी काढून नारळ नदीत अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोपाळकाला कार्यक्रम पार पडला. काल्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
