संतप्त आंबोली ग्रामस्थांची मागणी
आंबोली : सद्या सगळीकडे वीज वीज वितरणच्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे चित्र असून वितरण कंपनी आपल्या सुस्त व्यवहारातच धन्यता मानते आहे.सावंतवाडी तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या असून आंबोलीत सद्या फक्त दोन वायरमन कार्यरत आहेत. मागील आठ दिवस प्रचंड पाऊस आणि वादळ वारा असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा सुरु असून वीज गायब आहे. त्यामुळे नागरिक संतापग्रस्त झाले आहेत.त्यामुळे याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी आंबोली व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
आंबोली विभागात वीज वितरणने जास्त कर्मचारी नेमावेत, वीज समस्येकडे लक्ष द्यावे असे खुद्द खासदार विनायक राऊत यांनी अधीक्षक कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले होते. तशी मागणीही त्यांनी केली होती.त्या आधी सावंतवाडी येथे आमदार व आताचे मंत्री दीपक केसरकर यांनी देखील वीज समस्येबाबत सूचना केल्या होत्या. मात्र तरीही वीज वितरणने या ठिकाणी फक्त दोन कर्मचाऱ्यांवर गाडा हाकणे पसंत केले आहे.
सध्या येथे असणारे कर्मचारी आपले काम चोख बजावत आहेत. मात्र एवढ्या मोठ्या भागातील वीज समस्येसाठी कर्मचारी वाढवणे आवश्यक आहे. याबाबत वीज वितरण मात्र सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.यापूर्वी आंबोलीत ४ कर्मचारी होते. निदान गणेश चतुर्थीपर्यंत जास्त कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे. गेले आठ दिवस जास्त पाऊस आणि सोसाट्याचा वारा असल्यामुळे वीज समस्या निर्माण झाली आहे. १५ ऑगस्ट दरम्यान आंबोलीत पर्यटक देखील जास्त प्रमाणात येत असतात. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी देखील नाराजी व्यक्त करीत असून ग्रामस्थही नाराज आहेत.
गणपती शाळांमध्ये देखील वीज गायब असल्याने नामुष्की येत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी आंबोली व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
