भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ले अध्यक्षपदी नाना कोळेकर

वेंगुर्ला प्रतिनिधी – भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी खानोली येथील नाना कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा दौ-यावर असताना नियुक्ती पत्र प्रदान करत वेंगुर्ला तालुका कार्यालयात भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली.

याप्रसंगी बोलताना नवलराज काळे म्हणाले की, गरीब, वंचित, उपेक्षीत शेवटच्या माणसाप्रती भाजपाची असलेली भावना ही भाजपाच्या यशाचे गमक आहे. देशातील सर्वाधिक दलित, आदिवासी, ओबीसी, महिला या वर्गातील खासदार व आमदार भाजपाचे आहेत. या सामाजिक समरसतेमुळे, विश्वासामुळे भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त भटक्या विमुक्त जाती बांधव हे भाजपाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी तालुकानिहाय दौरे करुन भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवडंळकर, राजन गिरप, बाळा गोसावी (मालवण), धनगर समाज जिल्हा अध्यक्ष दिपक खरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
You cannot copy content of this page