पीक विमा नुकसानीसाठी आयोजित आंदोलनाला बागायतदार संघटनेचा पाठिंबा

बैठकीत निर्णय: १५ ऑगस्टला करणार आंदोलन

वेंगुर्ला प्रतिनिधी – आंबा काजू पिक विमा नुकसान भरपाई अद्यापर्यंत न मिळाल्याने सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासाठी तुळस, मातोंड, होडावडा बागायतदारांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी वेंगुर्ल तालुका कृषि कार्यालयासमोर होणा-या उपोषणास सर्वांनी उपस्थित राहून पाठींबा देण्याचा निर्णय आंबा-काजू बागायतदार संघटनेच्या सभेत एकमताने घेण्यात आला.

  प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग, कुडाळ आंबा काजू बागायतदार संघटनेची सभा आंबा-काजू मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या चर्चेत जयप्रकाश चमणकर, श्री. धुरी, किशोर नरसुले, गजानन वेर्णेकर, सावंतवाडीचे राजन नाईक, श्रीमती दिव्या वायंगणकर, स्वाती नेमण, बाळा गावडे, विजय सरमळकर, श्यामसुंदर राय, सदाशिव आळवे, नंदा पेडणेकर, आबा राऊळ, संदिप कोनाडकर, श्री. तेंडुलकर यांनी भाग घेऊन विविध सुचना मांडल्या.

  या सभेत संततधार पावसामुळे शेतीचे पचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करून नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी करण्यात आली. खतांच्या किमतीत भरमसाठ वाढल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी-बागायतदारांना ५० टक्के अनुदान द्यावे. तसेच यावर्षी फळमाशीमुळे आंब्याचे खुप नुकसान झालेल्याची दखल घेऊन सुरवातीपासून पिंजरे वितरीत करून काळजी घ्यावी असे ठरले. तौक्ते वादळाची जाहिर केलेली नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी अशीही मागणी करण्यांत आली. तसेच शासनाच्या स्तरावरून ५० टक्के अनुदानावर देण्यांत येणारी किटकनाशके शेतकरी व बागायदारांच्या पावत्या घेऊन त्यावर ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यांत आली. आभार सचिव अॅड. प्रकाश बोवलेकर यांनी मानले.
You cannot copy content of this page