नुकसानी मिळाली नसल्याने घेतला निर्णय
वेंगुर्ला प्रतिनिधी- पिक विमा २०२१-२२ मधील नुकसान भरपाई तात्काळ जमा करण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही नुकसान भरपाई न मिळाल्याने तुळस, होडावडा व मातोंड गावातील आंबा व काजू बागायतदार शेतक-यांनी १५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तालुका कृषी कार्यालासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तशा आशयाचे लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
पिक विमा २०२१-२२ मधील नुकसान भरपाई मिळण्याबाबत आंबा व काजू शास्त्रज्ञ विचारमंचच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. शासनाच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसांत पिक विमा जमा केला पाहिजे. तरी सुद्धा जोखीम तारीख उलटून ४५ दिवस झाले तरी अद्यापपर्यंत विमा नुकसान भरपाई जमा केलेली नाही. तसेच सर्व बागायतदारांनी मिळून सुद्धा निवेदन दिले असता तालुका कृषी अधिकारी यांनी रिलायन्स विमा कंपनीकडे पाठपुरावा केला. परंतु, अद्यापपर्यंत विमा नुकसान भरपाई मिळालेली नसून आम्ही शेतकरी व बागायतदार १५ ऑगस्ट रोजी तालुका कृषी कार्यालयांकडे पिक विमा संदर्भात आंदोलन करत असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.
