किल्ला प्रवासी वाहतूक संघटना करणार कुटुंबासह उपोषण

सर्व्हे प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने घेतली आक्रमक भूमिका

मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबईकडून ऑनलाईन सर्व्हे प्रमाणपत्र व्यावसायिकांना वेळेत न मिळाल्यामुळे सर्व बाबींची पूर्तता करूनही आम्ही अनधिकृत दिसत असल्याने त्यावर योग्य निर्णय होऊन स्थानिक पातळीवर सर्व्हे प्रमाणपत्र मिळावे किंवा नौकेचा सर्व्हे झाल्यावर त्याच जुन्या सर्व्हे प्रमाणपत्रावर त्वरित सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्याने ऑफलाईन नूतनीकरण करून ध्यावे या आणि अन्य मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास दि १४ ऑगस्ट रोजी १५० कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत आणि शिवशक्ती जलपर्यटन चालक-मालक विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप आचरेकर या दोन्ही संस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर सद्यस्थितीत दोन्ही संस्थांमधील एकूण ७१ नौकाधारक प्रवासी वाहतूक व्यवसाय करतात. २४ मे रोजी तारकर्ली येथे झालेली दुर्घटना खरोखरच दुर्दैवी आहे. या अनुषंगानेच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. अशा अपघातांमुळे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांपासून मिळणाऱ्या व्यवसायाला आम्हाला मुकावे लागत आहे. गेली ५० वर्षे आम्ही या जलमार्गावर शिवकालीन वारसा जपण्यासाठी अजूनही लाकडी बोटींचा वापर करतो आहोत. या जलमार्गावर फायबर बोटींना भविष्यात परवानगी देऊ नयेत.. कारण सिंधुदुर्ग किल्ला हे ऐतिहासिक स्थळ आहे. या ठिकाणी लाकडी बोटींनाच परवानगी असावी. जेणे करून ऐतिहासिक वारसा जपता येईल आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हे योग्य ठरेल, असे दोन्ही संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई या कार्यालयाकडून प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्याकडून या अर्जदारास परवानगी द्यावी. की कसे याबाबतचा अहवाल घेतला जातो. या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या अहवालात त्या ठिकाणी जेटीची व्यवस्था नसल्याने किंवा स्थानिक संस्थेच्या म्हणण्या नुसार नवीन परवानगी देण्यात येऊ नयेत, असे प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केले असूनही नवीन परवानगी देण्यात येत आहे. त्याला तात्काळ स्थगिती मिळावी. मालवण बंदराची क्षमता निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर वॉटर स्पोर्टस् आणि पॅरासेलिंगसारख्या अशा साहसी जलक्रीडांना परवानगी दिलेली आहे. या नौकांना हायस्पीड व्होलवो इंजिन असते. त्यांचा मार्ग व आमचा मार्ग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील मार्ग खडकाळ, अरुंद व मर्यादित असल्याने या बाबींचा विचार करता, नवीन ज्यादा बोटींची वाढ होणे म्हणजे अपघातास एकप्रकारे आमंत्रण दिल्यासारखे आहे. म्हणून या मार्गावर पुढील ५ वर्षे तरी नवीन परवानगी देऊ नयेत. सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर कार्यरत असलेल्या संस्थांकडून नवीन परवानगी मागणाऱ्यास त्या संस्थेचा अनुभवाचा दाखला किंवा ना हरकत घेणे अनिवार्य केले जावे, बंदर विभागाकडून २५ मे पर्यंत किल्ला प्रवासी वाहतुकीस परवानगी दिलेली असते. तरीही हवामानाचा अंदाज घेऊन स्थानिक बंदर अधिकाऱ्यांना प्रवासी वाहतुकीस मुदतवाढ देण्याचे अधिकार असावेत, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात येणाऱ्या परवानगी या अशा ठिकाणी देण्यात येतात, ज्या ठिकाणी प्रवाशांना चढण्या उतरण्यासाठी त्या ठिकाणी जेटीची सुविधाच उपलब्ध नसतात. त्या ठिकाणी परवानगी देणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल दोन्ही संघटनांनी उपस्थित करत जेथे जेटीची व्यवस्था आहे, तेथे त्यांना वळते करावे, अशी सूचना केली आहे. सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर देण्यात आलेले नवीन उद्देशपत्र व परवानगी अन्य मार्गावर म्हणजेच ‘नौकाविहार, कवडा रॉकदर्शन, निवती लाईट हाऊस अशा अन्य मार्गावर वळविण्यास हरकत नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page