⚡कणकवली ता.०३-: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी भुकेचा प्रश्न प्रथम हाताळला. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून बहुजन समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे व्यक्तीकडून सुरू होते ते समष्टीकडे जाऊन भिडते. अण्णा भाऊ साठेची केवळ जयंती न करता अण्णा भाऊंच्या विचाराचा आणि साहित्याचा जागर करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे जयंती निमित महाराजा हॉल, कणकवली येथे ‘अण्णाभाऊंच्या स्मृतीचा जागर’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे महासचिव डॉ.राज ताडेराव होते तर प्रमुख वक्ते म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ. सोमनाथ कदम उपस्थित होते.
यावेळी मंचावर दर्पण प्रबोधनी सिंधुदुर्ग चे अध्यक्ष आनंद तांबे, प्रकल्प अधिकारी बार्टी सिंधुदुर्ग चे विजय कदम, जिल्हा परिषद देवगड सिंधुदुर्ग येथील अभियंता अनिल तांबे उपस्थित होते.
यावेळी सोमनाथ कदम म्हणाले की,अण्णा भाऊ साठे हे सुप्रसिद्ध लेखक म्हणून सर्वांनाच परिचित आहेत.पण ते कार्यकर्ते, लेखक व विचारवंत होते.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील माणसे समाजातील सभोवताली आढळणारी आहेत.त्यांच्या लेखनाची भूमिका वाचकाला अंतर्मुख विचार करायला लावणारी आहे म्हणून त्यांचे साहित्य अजरामर ठरले.
या प्रसंगी आनंद तांबे व विजय कदम यांनीही अण्णा भाऊच्या समग्र लेखनकार्यावर प्रकाश टाकला .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून बार्टीच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आर्थिक सहकार्याने कातकरी समाजातील गुणवंत विद्यार्थी बंटी स्वनील पवार ,वैशाली सुनील पवार, सायली लक्ष्मण निकम यांना वह्या व दप्तर देऊन गुणगौरव करण्यात आला.
लावणी, पोवाडे,कथा, कादंबऱ्या यातून त्यांनी सामाजिक विचार मांडले.अण्णा भाऊच्या कार्याचा आढावा घेऊन अण्णा भाऊंच्या एकूणच लेखनकार्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वांची ओळख आपणास होते असे अध्यक्षस्थानावरून प्रा.डॉ. राज ताडेराव बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा हडकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती चव्हाण यांनी मानले. यावेळी बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी सुदीप कांबळे, सौ. मृणाल फाळके अच्युत देसाई, संतोष कोरलेकर सुजय जाधव यांचे सहकार्य लाभले.
