कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा
⚡कणकवली ता.३०-:
मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे . कारण , मोबाईलमध्ये मनोरंजन , खेळ हे प्रकार असतात , त्याचप्रमाणे वेगवेगळी एज्युकेशन अॅप्स ही उपलब्ध असतात . त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर ‘ जनरल नॉलेज ‘ वाढविण्यासाठी करावा . पालकांनीही आपली मुले मोबाईलचा वापर कसा करतात याबाबत दक्ष रहायला हवे , असे मार्गदर्शन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी केले .
कणकवली तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला , त्याप्रसंगी श्री . मोहिते बोलत होते . कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर , अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे , ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर , सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे , जिल्हा प्रतिनिधी संतोष राऊळ , कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे , ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण , दिलीप हिंदळेकर आदी उपस्थित होते .
बाळासाहेब मोहिते म्हणाले , पत्रकार समितीतर्फे उद्याच्या पिढीचा सत्कार होत आहे . सध्याचे युग स्पर्धेचे आहे . बारावीनंतर मेडीकल इंजिनियरिंग प्रवेशाप्रसंगी हजारभर जागांसाठी लाखोंचे विद्यार्थी प्रवेशअर्ज करतात . अर्थातच स्पर्धेत स्वतःला सिद्ध करायचे असेल तर टोकाचा अभ्यास आवश्यक आहे .
उमेश तोरसकर म्हणाले . कणकवली पत्रकार समितीने पाल्यांच्या सत्काराचे केलेले नियोजन कौतुकास्पद आहे . जिल्हयातील पत्रकारांच्या पाल्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा पत्रकार संघ नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे . पत्रकारांच्या पाल्यांमधील गुणवत्ता नक्कीच दखलमय आहे . साहजिकच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणेही तितकेच गरजेचे आहे . कणकवली पत्रकार समितीचे गेट टूगेदरचा कार्यक्रम नक्कच उल्लेखनिय आहे . त्यापासूनच प्रेरणा घेऊन जिल्हा पत्रकार संघातर्फेही जानेवारी महिन्यात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी गेट टूगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे .
अरूण चव्हाण म्हणाले , कणकवली तालुका पत्रकार संघाने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे . कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात शासकीय वगळता पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम होत आहे . प्रत्येक संवर्गामध्ये पाल्यांचे सत्कार कार्यक्रम होत असतात . अर्थात पत्रकार समितीनेही असा उपक्रम आयोजित केला हे उल्लेखनिय आहे . स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे . त्यामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे .
गणेश जेठे म्हणाले , ‘ लोकशाही टिकविण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे . कारा छापून येते ते सत्य असते , हा जनतेचा विश्वास आहे . त्यामुळे पत्रकारांनी तटस्थपणे लिखाण करावे असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या . रमाण्णा यांनी केले आहे . वास्तविक पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्हीही सातत्याने राबत असतो . पण , प्रथम तीन स्तंभाच्या तुलनेत चौथ्या स्तंभामध्ये मानधनाचा प्रश्न गंभीर आहे . अशा स्थितीतही पत्रकारांची मुले उच्चशिक्षीत होताना दिसतायत . त्यामुळे पत्रकार बेजबाबदार नाहीत , हे स्पष्ट होते . कारण , प्रत्येक पत्रकार आपल्या संस्थेच्या माध्यमातून चांगले काम करून अप्रत्यक्षपण देशसेवाच करत असतो .
संतोष वायंगणकर म्हणाले , कणकवली पत्रकार समितीने खूपच चांगला उपक्रम राबविला आहे . त्यामाध्यमातून पत्रकारांची कुटुंब एकत्र येऊन चांगला संवाद घडतो . अर्थात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे .
प्रास्ताविकात चंद्रशेखर देसाई म्हणाले , विविध संघटना , समाज यांच्यामार्फत विद्यार्थी , पाल्यांचा गुणगौरव होत असतो , त्याचप्रमाणे पत्रकार समितीतर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला . गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी , त्यांना प्रोत्साहन मिळावे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे . तर अशा कार्यक्रमामुळे आम्हा पत्रकार बांधव व कुटुंबियांना एकत्र येण्याची संधी मिळते . याप्रसंगी अनुष्का मनिष गांधी , प्रियंका गणेश जेठे , मंथन तुषार सावंत , जाह्नवी – प्रकाश निमणकर , मनिष लक्ष्मीकांत भावे , सानिका दत्तात्रय मार्कड , ऋतूजा मिलिंद डोंगरे , ऋचा सुभाष पवार , पार्थ सुभाष पवार , नितांत राजन चव्हाण , चेतन नितिन कदम , विधी वीरेंद्र चिंदरकर , अथर्व गुरुप्रसाद सावंत या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे तर आभार खजिनदार नितीन कदम यांनी मानले .
