परस्पर भाडेकराराचा वैश्य समाजाचा आरोप; नवीन समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती..
⚡सावंतवाडी,ता.१०-: सावंतवाडी शहरातील गवळीतीठा येथील वैश्य भवनची जागा परस्पर आणि कोणताही कायदेशीर अधिकार नसताना भाड्याने दिल्याने समाज बांधवांनी कोल्हापूर येथील धर्मादाय सह आयुक्तांकडे दाद मागितली आहे. यावर सुनावणी करताना धर्मादाय सह आयुक्तांनी या जागेबाबत “जैसे थे” स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वैश्य समाज पदाधिकारी रमेश भाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वैश्य समाज युवा अध्यक्ष अमित गावंडळकर सह मान्यवर उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना रमेश भाट म्हणाले की, वैश्य वाणी समाज बांधवांची संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. समाजाच्या हितासाठी पोकळे बंधूंनी गवळीतीठा येथे जमीन दिली होती आणि समाजाने एकत्र येत तेथे इमारत उभी केली. या माध्यमातून समाजाच्या हिताचे विविध उपक्रम राबवणे अपेक्षित होते. मात्र, संस्थेचे कारभारी म्हणून काम पाहणारे रमेश बोंद्रे व बाळ बोर्डेकर यांनी समाज बांधवांना विश्वासात न घेता, येथील हॉल भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला. त्यांनी ‘ग्लोबल कंपनी’चे मायकल डिसोझा यांच्या संस्थेशी भाडेकरार केला. वास्तविक पाहता, सन १९५४ पासून धर्मादाय आयुक्त कार्यालयात कोणताही चेंज रिपोर्ट दाखल झालेला नाही. त्यामुळे रमेश बोंद्रे यांना असा करार करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. या परस्पर कराराची माहिती मिळताच समाज बांधवांनी कायदेशीर मार्गाने लढा देत धर्मादाय सह आयुक्तांकडून या कामाला स्थगिती मिळवली आहे. आता लवकरच समाजाची नवीन कमिटी धर्मादाय सह आयुक्त यांच्या कडून नियुक्त करण्यात येणार असल्याचेही श्री भाट यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपरिषदेचे नियोजन समिती सभापती आनंद नेवगी म्हणाले की, वैश्य समाज बांधवांच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. समाजात वाद नको म्हणून आम्ही इतके दिवस गप्प होतो. मात्र, परस्पर भाडेकरार करून संपूर्ण समाजाला अंधारात ठेवणे अत्यंत चुकीचे आहे.
युवा अध्यक्ष अमित गवडंळकर यांनी सांगितले की, वैश्य भवनच्या इमारतीमध्ये समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. असे असताना समाजातील घटकांचे मत जाणून न घेता परस्पर व्यावसायिक करार करणे अनाकलनीय आहे. अरूण भिसे म्हणाले, आम्ही अतिशय शांत पध्दतीने हे प्रकरण हाताळले. समाजाची बदनामी होणार नाही अशी खबरदारी घेतली.
या पत्रकार परिषदेला संतोष मुंज,
अँड पुष्पलता कोरगांवकर ,तनुजा पोकळे,
शुभांगी सुकी,जयेश स्वार ,अवधूत नार्वेकर,
अरुण भिसे,शैलेश गावंडळकर,
मुन्ना कोरगावकर ,शंभू विरणोडकर,
संजय नार्वेकर, अण्णा म्हापसेकर,
नाना गावंडळकर,सुनील मिसाळ,
आनंद नेवगी,सुदेश नेवगी,हर्षद पोकळे,
कपिल कोरगांवकर,प्रतिक कोरगांवकर,
श्रेयस मुंज,ऋतिक कोरगांवकर,पल्लवी स्वार,सत्यवान बांदेकर, अनिल भिसे,
नित्यानंद कोरगांवकर, जतिन भिसे,
तुषार कोरगांवकर आदी उपस्थित होते.
