*💫कणकवली दि.२२-:* स्वतःचे पहिले लग्न झालेले असल्याचे लपवून ठेवत रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पीडित युवतीवर बलात्कार करणाऱ्या नराधाम रतनू उर्फ रतन विष्णू कांबळे ( रा.रवळनाथ मंदिरनजीक, नागवे रोड कणकवली ) याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत रतनू कांबळे याने पीडित युवतीशी जवळीक साधली होती. स्वतःचे लग्न झालेले असतानाही ही बाब पिडितेपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर पीडित युवतीवर बलात्कार केल्याची फिर्याद सदर युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आरोपी रतन विष्णू कांबळे ला अटक करून महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी आज कणकवली न्यायालयासमोर हजर केले. सरकारी वकील ऍड गजानन तोडकरी यांनी आरोपीला पोलीस कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला. ऍड.तोडकरी यांनी आरोपी रतनू याच्यावर रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे कणकवली आणि राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. आरोपीने पीडित युवतीशी कोठे लग्न केले ? पीडितेवर कोणत्या लॉजवर शारीरिक संबंध ठेवले ? आदी बाबींच्या तपासकामी आरोपीला पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद ऍड तोडकरी यांनी केला. सरकारी वकील ऍड तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सलीम जमादार यांनी आरोपी रतनू कांबळे याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
