⚡बांदा ता.३०-: घारपी (ता. दोडामार्ग) येथील नामवंत दशावतार कलाकार कै. सखाराम कविटकर यांचा अपंग मुलगा चंद्रशेखर याला बांद्यातील दशावतार प्रेमींकडून आर्थिक मदत देण्यात आली. बँक आॅफ इंडियाच्या बांदा शाखाचे व्यवस्थापक अंकित धवन यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. सदर अपंग तरुणाला शासन दरबारातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे बांदा सरपंच अक्रम खान यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या अनास्थेमुळे कोकणातील दशावतार ही प्रमुख लोककला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. कलाकारांची ‘रात्रीचो राजा व सकाळी डोक्यावर बोजा’ अशी सत्य परिस्थिती झालेली आहे. तुटपुंज्या मानधनामुळे दशावतार कलेकडे आजचा तरुण वळताना दिसत नाही. ही लोककला जीवंत राहण्यासाठी शासन स्तरावरुन भरघोस आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, असे यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार संतोष रेडकर यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अक्रम खान, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, बांदा ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, शाम मांजरेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, घारपी मठाचे विजय गावकर, दशावतार कलाकार दादा राणे, नारायण आसयेकर, बंटी कांबळी, संतोष रेडकर, ज्ञानेश्वर सावंत, शाखा व्यवस्थापक अंकित धवन, विनायक देसाई, सुनील धामापूरकर, संजय सावंत, विकी कदम आदी उपस्थित होते.
फोटो:-
घारपी येथील चंद्रशेखर कविटकर याला मदत देताना अंकित धवन. सोबत अक्रम खान, विजय गावकर, ज्ञानेश्वर सावंत, मकरंद तोरसकर, दादा राणे, संतोष रेडकर व अन्य. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
दशावतार प्रेमींकडून चंद्रशेखर कविटकरला आर्थिक मदत
