गवारेड्याना हुसकावणे शेतकऱ्यांच्या आले अंगलट

गवारेड्यानी केला पाठलाग; नाटळ येथील धक्कादायक प्रकार

⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालक्यातील नाटळ गावातील पिंपळाचा माळ आणि थोरले मोहूळ या परिसरात गवारेड्यांच्या कळपांचा व सांबरांच्या कळपाचा मुक्त संचार झाला आहे. यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा गवारेडयांनी पाठलाग केल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागण्याची वेळ आली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

वनविभागाने या बाबत तत्काळ कार्यवाही करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून केली जात आहे. नाटळ येथील शेतकरी तुळाजी राणे, जितेंद्र सावंत, दीनानाथ सावंत हे आपल्या शेतात आलेल्या गवारेडयांच्या कळपाला हुसकावून लावण्यासाठी गेले असता गवारेडयांनी त्यांचा पाठलाग केला. झाडावर चढल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे . त्या मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळाचा माळ येथील जितेंद्र सावंत , दीनानाथ सावंत , तुळाजी राणे , प्रसाद पाताडे , नलेश परब , सुधीर गुडेकर , निलेश सावंत , मनोहर पाताडे यांच्या भात शेतीत गवारेडयांच्या व सांबरांच्या कळपांनी धुडगूस घालण्यास सुरवात केली आहे . तसेच थोरले मोहूळ येथील सत्यवान सावंत , प्रमोद शिरसाट यांच्या ही शेतात गवारेडयांनी धुडगूस घातला आहे . दरवर्षी येथील शेती ही रानटी प्राण्यांच्या भक्ष्य स्थानी पडत असून येथील शेतकरी मात्र नुकसान भरपाई पासून वंचीत राहत आहेत . या बाबत वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे .

येथील भातशेती ही सह्याद्री पट्यातील जगलांपासून नजिक असल्याने शेतकऱ्यांना अशा संकटांना वारंवार सामोरे जावे लागते .त्या मुळे दरवर्षीच्या होणाऱ्या नुकसानीला कंटाळून या वर्षी नाटळ गावातील बहुतांश म्हणजे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनी भात शेती व इतर शेतीला रामराम केला आहे. दाजीपूर अभयारण्यातील गवारेड्यांचे कळप कोकणातील भात शेतीत घुसून सध्या धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

भात पेरणीपासून भात पीकेपर्यंत शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतो, अशातच जंगली जनावरांच्या धुमकुळाने तोंडी आलेला घास दूर होत आहे या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत . वनविभागाने याबाबत ठोसपावले उचलून शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे .

You cannot copy content of this page