मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा
⚡बांदा ता.२७-: गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना मडुरे स्थानकावर थांबा मिळावा या आशयाच्या मागणीचे निवेदन दशक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे कोरेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले. मडुरे स्टेशन मास्तर कृष्णकांत परब यांच्याकडे सदर निवेदन जगन्नाथ पंडीत यांनी सुपूर्द केले. गाड्यांना थांबा न दिल्यास स्वातंत्रदिनी स्टेशन आवारात दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सवात कोकण रेल्वेतून हजारो चाकरमानी गावाकडे येतात. त्यासाठी कोरे प्रशासनाने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या गाड्यांना मडूरे स्थानकात थांबा दिलेला नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना सावंतवाडी स्टेशनवर उतरावे लागते.
सावंतवाडीतून गावात येण्यासाठी ८०० ते हजार रुपये भाडे देऊन रिक्षा किंवा चारचाकी वाहन करुन येणे भाग पडते. त्यामुळे नाहक प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागते. मडूरे स्टेशनवर विशेष गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय १३ अॉगस्ट पर्यंत न झाल्यास स्वातंत्रदिनी स्टेशन आवारात उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सातोसेचे जगन्नाथ पंडीत, माजी सरपंच प्रकाश गावडे, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, रोणापाल उपसरपंच भिकाजी केणी, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, अरुण परब, घनश्याम चौकेकर, रुजाय फर्नांडिस, पेद्रु डिसोझा, विद्या धारगळकर, मोहन गवस, सदानंद गावडे, मंदार गावडे, बाबल तुयेकर, सचिन कुबल, सुनील मडुरकर, दीपक कोचरेकर, संतोष सावळ, रुजिनाल रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.
