सेना मेडल विजेते कर्नल दिपक दयाळ यांचे प्रतिपादन;भंडारी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी जवानांना पाठविल्या ११३०० राख्या
⚡मालवण ता.२६-: रक्षाबंधनाच्या निमित्ताने भंडारी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींकडून सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणाऱ्या राख्या हे पुण्याचे काम आहे. मुलींनी जवानांसाठी बंधुप्रेमाचे प्रतीक म्हणून पाठविलेल्या राख्यांमुळे सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढून त्यांना सीमेवर लढण्यास प्रेरणा व प्रोत्साहन मिळेलच शिवाय राख्यांच्या रूपाने देशातील लोक आपला विचार करत आहेत हे जवानांना समजून त्यांचा निश्चित आत्मविश्वास दुणावेल भंडारी ज्युनिअर कॉलेजने गेली सहा वर्षे सुरू ठेवलेले हे स्तुत्य कार्य अखंड अविरत सुरू ठेवावे, असे गौरवोद्गार ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग चे कमांडिंग ऑफिसर सेना मेडल विजेते कर्नल दिपक दयाळ यांनी येथे बोलताना केले
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून एक राखी सैनिकांसाठी …सीमेवरच्या भावांसाठी या उपक्रमांतर्गत देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना राख्या पाठविण्याचा कार्यक्रम आज मंगळवारी ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग चे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिपक दयाळ सुभेदार मेजर दिनेश गेडाम , मालवणचे तहसीलदार श्री. अजय पाटणे, मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. विजय यादव , सिंधुदुर्ग कॉलेजचे एन सी सी चे डॉ एम आर खोत , ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वामन खोत , पर्यवेक्षक एच बी तिवले ,प्रा पवन बांदेकर , प्रफुल्ल देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा पवन बांदेकर सर यांनी केले तर मान्यवरांचा परिचय प्रफुल्ल देसाई यांनी करून दिला यावेळी उपस्थित मान्यवरांनी १०० पेक्षा जास्त राख्या बनविणाऱ्या तन्वी पराडकर (११८५ राख्या), चिन्मयी ढोलये (११८० राख्या ), साक्षी केळुसकर (११२४ राख्या ) यांच्यासह ३० विद्याथीनींचा भेट व गुलाब पुष्प देऊन गौरव केला यावर्षी जुनिअर कॉलेजच्या मुलींनी तयार ११३०० राख्या पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, विशाखापट्ट्णम, पोर्ट्ब्लेयर- अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाना, पूलवामा, लेह, जम्मू आणि काश्मिर, उधमपूर आदी ठिकाणी देश रक्षणाचे महान कार्य करणार्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात येणार आहेत . या उपक्रमासाठी टेक्नो कंपनीचे श्री मंगेश कुलकर्णी यांनी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर आणि प्रा. पवन बांदेकर यांचे विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले
यावेळी बोलताना तहसीलदार अजय पाटणे यांनी भंडारी ज्युनियर कॉलेजने जवानांना राख्या पाठविण्याचा हा उपक्रम सुरू करून त्यामध्ये सातत्य ठेवले याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक थोडे आहे. हे कॉलेज नेहमीच काहीतरी हटके करण्यासाठी , वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. मालवणमधून थेट हिमालया मध्ये तसेच अन्य ठिकाणी या ज्युनिअर कॉलेजच्या मुली राख्या पाठवतात हे वाखाणण्याजोगे आहे. आपण इथे शांत बसण्यासाठी, झोपण्यासाठी सीमेवरील सैनिक अहोरात्र आपल्या सीमेचे रक्षण करतात. सीमेवर आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी देशातील नागरिकांच्या काही भावना आहेत आणि तुम्ही तुमच्या भावना या राख्या बनवून त्यांच्या पर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले तर प्राचार्य वामन खोत यांनी भारतीय जवानांना आमच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी राख्या पाठवून एक नवी उमेद दिली आहे. एखादा सैनिक सीमेवर लढतो पराक्रम दाखवतो वीरगती आली तरीही तो घाबरत नाही याच कारण फक्त एकच आहे त्यांच्यामध्ये असलेले आत्मिक मनोबल आणि हे आत्मिक मनोबल देण्याचे काम तुम्ही युवतींनी केले आहे हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. विजय यादव यांचेही भाषण झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी प्रा. वैभवी वाक्कर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले.
