⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला-शिरोडा-उभादांडा रस्ता हा पूर्ण खड्डेमय झाला असून याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. प्रत्येकवेळी निवेदन दिल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून लोकांची फसवणूक करत करताना निधी आणि माणसे कमी असल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग पुढे करत आहे. उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलसमोर तसेच हेळेकर मंदिर, सुखटणवाडी, वरचेमाडवाडी येथे भले मोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराबाबत उभादांडा ग्रामस्थांनी २१ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागा वेंगुर्ला यांना धारेवर धरले. येत्या ८ दिवसात अंमलबजावणी न झाल्यास ग्रामस्थांमार्फत रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
वेंगुर्ला-रेडीरेवस हा सागरी महामार्ग असून उभादांडा गावातील रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. महिन्याभरात गणेश चतुर्थी हा मोठा सण येत आहे या निमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहतूक होत असते. त्यामुळे येणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे या सर्व गंभीर बाबींचा विचार करून रस्ता खड्डेमुक्त करून नागरिकांना त्रासातून मुक्तता द्यावी. बांधकाम विभागतर्फे गणपती मंदिर ते केपादेवीपर्यंत रस्ता मंजूर असल्याचे बांधकाम अधिकारी मुळे तसेच भगत यांनी पत्र दाखविले. परंतु अद्याप पर्यंत कामाला सुरुवात न केल्यामुळे ग्रामस्थांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. कोणतेही कारण ऐकण्यासाठी आम्ही येथे आलो नाही. मच्छिमार बांधव, शेतकरी, शाळेतील मुलं, रिक्षा व्यवसायिक, तसेच सर्व सामान्य लोकांना ह्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पूर्ण रस्त्यावर झाडी वाढली असून ती तोडली नाहीत, गटार सफाई केली नाही असे प्रश्न यावेळी उपस्थित केले गेले. ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा, हितेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य गणेश चेंदवणकर, दया खर्डे, आनंद मेस्त्री, श्री. धावडे, बळी कुबल, विनायक रेडकर, दीपक जुवलेकर यांनी निवेदन दिले. या निवेदनावर जवळपास ४० ते ५० लोकांनी सह्या केल्या आहेत. येत्या ८ दिवसात अंमलबजावणी न झाल्यास ग्रामस्थांमार्फत रास्ता रोको करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला.
