मोरी साडेतीनशे रुपये किलो तर बांगडा बाराशे रुपये टोपली भावाने विक्री
मालवण दि प्रतिनिधी
मासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही मालवण बंदरात सलग आज चौथ्या दिवशी मोरी या माशाची मोठी आवक झाली मालवणच्या समुद्र किनारी भरलेल्या लिलावाच्या ठिकाणी तर मोरी साडेतीनशे रुपये किलो भावाने विकली गेली असून मोरीचा हा भाव गेले चार दिवस स्थिर आहे एकीकडे ही मोरीचा भाव स्थिर असतानाच दुसरीकडे मात्र काल पर्यंत पाचशे रुपये टोपली दराने विकला जाणारा बांगडा आज बाराशे रुपये टोपली या भावाने विकली गेला
दरम्यान, बंदी कालावधीत पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या रापण मासेमारीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासळी मिळणे शक्य नसून ही मासळी आऊटबोट इंजिनच्या साहाय्याने केलेल्या मासेमारीतून बाजारात आली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी बंदी कालावधीतही यांत्रिक पद्धतीने होणाऱ्या या मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभाग लक्ष का देत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
पश्चिम किनारपट्टीवर सध्या ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी सुरू असून ३१ जुलै पर्यंत हा कालावधी राहणार असून १ ऑगस्ट पासून पुन्हा मासेमारी करण्यास परवानगी असणार आहे. या कालावधीत समुद्रात सर्व प्रकारच्या यांत्रिक पद्धतीने होणाऱ्या मासेमारीला बंदी आहे. तर पारंपारिक रापण व गरी पद्धतीच्या मासेमारीला मुभा आहे. मासेमारी बंद असल्यामुळे तसेच पारंपारिक मासेमारीत तेवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मालवणच्या मच्छीमार्केट मध्ये मासळीची आवक घटली आहे. सध्या मार्केट मध्ये खाडीतील मासेमारीचा व रापणीतून मिळणारा मासा मिळत आहे. मात्र गेले काही दिवस किनापट्टीवर पावसाने दडी मारली असल्याने तसेच समुद्र शांत असल्याने आउटबोट इंजिनधारक नौका मासेमारीस समुद्रात जात आहेत. यामुळे बाजारपेठेत अचानक मोरी माशाची आवक वाढली आहे. तर बांगडा, सौंदाळा मासाही दिसू लागला आहे. यामुळे मासेमारी बंदी कालावधीतही मत्स्य खवय्यांची चंगळ झाली आहे. मोरी मासा साडे तीनशे ते चारशे रुपये किलो दराने विकली जात आहे. यामुळे मासे खरेदी साठी गेले दोन – तीन दिवस मच्छी मार्केट मध्ये गर्दीही दिसत आहे.
मात्र, मासेमारी बंदी कालावधीतही यांत्रिक पद्धतीने मासेमारी होत असताना मत्स्य व्यवसाय विभाग डोळे झाक का करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. नियम डावलून बेकायदेशीर पद्धतीने होणाऱ्या यांत्रिक व एलईडी मासेमारी रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभाग कार्यवाही करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.