रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात अधीक्षक अभियंत्याचे सरपंच सुरेश गावडे यांना आश्वासन
⚡बांदा ता.२२-: पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार उद्भवणारी वीज समस्या अजूनही कायमच आहे. लेखी निवेदने, उपोषण, घेराव घालूनही वीज वितरण विभागाला जाग येत नसल्याने ग्राहक हतबल झाले असून वीज समस्या कधी मार्गी लावणार असे सांगत रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी महावितरणच्या कामावर अधिकाऱ्यांसमोरच ताशेरे ओढले. सर्व समस्या ऐकल्यानंतर गणेशोत्सवा अगोदर मडुरा पंचक्रोशीसह आरोस परिसरातील वीज समस्या कायमची मार्गी लावणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री.विपर यांनी सरपंच सुरेश गावडे यांना दिले.
रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत अधीक्षक अभियंता श्री. विपर बोलत होते. यावेळी अतिरिक्त अभियंता श्री. मिसाळ, उपअभियंता श्री.भुरे, शाखा अभियंता श्री. यादव, लाईन स्टाफ श्री. सपकाळे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब उपस्थित होते.
दांडेली मार्गे डोंगरातून मळेवाड सब स्टेशन येथे जाणारी लाईन अद्ययावत करणे, सातार्डा लाईन अद्ययावत करणे, आरोस फीडरवरून जाणाऱ्या सर्व लाईनवरील झाडे तोडून सफाई करणे, फीडरवरील सर्व गावांतील एलटी लाईनवर आलेली झाडे तोडून अद्ययावत करणे, कामगार वाढविणे तसेच प्रसंगी निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री विपर यांनी दिले. गणेशोत्सव तोंडावर आल्याने वीज अधिकाऱ्यांच्या आश्वासनांवर निर्भर न राहाता नेमक्या समस्या कधी मार्गी लावणार असा सवाल सुरेश गावडे यांनी केला.
गतवर्षी वीज वारंवार खंडित होत असल्याने सर्वात मोठा फटका गणेश मूर्तीकारांना बसला. तसेच ऐन गणेशोत्सवातही विजेचा खेळखंडोबा सुरूच होता त्यामुळे गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती यावर्षी करू नये असे निर्देश श्री.गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तर गणपती चित्र शाळांना विजेची समस्या उद्भवणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत तसेच पाणी पुरविणाऱ्या नळयोजना विजेअभावी जास्त वेळ बंद राहणार नाहीत यासाठी सरपंचांना समाविष्ट करून एक ग्रुप तयार करून त्याद्वारे माहिती पुरवण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक व वैयक्तिक थांबलेली कामे तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री. विपर यांनी सुरेश गावडे यांना दिले.
दरम्यान, दिलेले आश्वासन गणेशोत्सवा अगोदर पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडणार असून याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर राहील असे सरपंच गावडे यांनी बोलताना सांगितले.