विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करताना गेले होते पळून
⚡सावंतवाडी,ता.२१-: विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करताना पळून गेलेले ते दोन डंपर चालकांना पकडण्यात सावंतवाडी पोलिसांना अखेर आज यश आला आहे. त्या दोघांना त्यांच्या ताब्यातील दोन्ही डंपर पोलिसांनी जप्त करत अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. भिन्नु पुन्नू पवार (४१) रा. कर्नाटक व मनोज सुरेश शिंदे (३०) रा. निवजे-देऊळवाडी, कुडाळ, अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अंमलदार शरद लोहकरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री.लोहकरे म्हणाले, १७ जुलैला मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे महसूल प्रशासनाकडून विनापरवाना वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू होती. यावेळी संबंधित दोन्ही डंपरचालकांना थांबण्याचा इशारा करून सुद्धा त्यांनी पालायन केले होते. दरम्यान याप्रकरणी नेमळे तलाठी अनिल पाटोळे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज त्यांचा शोध घेऊन डंपरसह अटक करण्यात आली आहे. मात्र आतील वाळू पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यामुळे ती वाळू नेमकी कुठे लपवली ? याबाबतचा शोध घेण्यासाठी आम्ही एक दिवसाची पोलीस कोठडी मागितली, असे श्री. लोहकरे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली
