एसपींच्या उपस्थितीत ग्राम संरक्षक पथक स्थापन;करूळ येथे ग्राम संरक्षकांना करण्यात आले किट वाटप
वैभववाडी प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक माणूस हा पोलीस आहे. प्रत्येकाने पोलिसासारखं राहिले पाहिजे. संकटकाळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या तरुणांचा पोलीस खात्याला अभिमान आहे. पोलिसांवर सामाजिक कार्य करण्यासाठी संस्थांनी पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी व्यक्त केले.
करूळ येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्राम संरक्षक पथकाची बैठक श्री राजेंद्र दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दाभाडे यांच्या संकल्पनेतून हे ग्राम संरक्षक पथक स्थापन करण्यात आले आहे. करुळ ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी पथकातील सर्व सदस्यांना टी-शर्ट, बॅटरी व शिट्टी आदी साहित्याचे वाटप दाभाडे यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी संदीप सरवणकर, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, माजी सरपंच हिंदुराव पाटील, सह्याद्री जीवरक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामसेवक शशिकांत गुरव, शरद सावंत, रमेश पांचाळ व पथकातील सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथकातील सदस्यांची कर्तव्य काय? त्यांची जबाबदारी काय? याबाबत मार्गदर्शन दाभाडे यांनी यावेळी केले. उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी प्रास्ताविकात पथकामार्फत करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. अमित यादव, हिंदुराव पाटील, श्री. सरवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. रिक्षाचालक मंगेश शिवगण यांनी रस्त्यातील अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल राजेंद्र दाभाडे यांनी घेत शिवगण यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. करूळ पोलीस चेक नाका या ठिकाणी पोलिसांसोबत गेले तीस वर्ष प्रामाणिक व निष्ठेने काम करणाऱ्या पोलीस मित्र नारायण शिंदे यांचा राजेंद्र दाभाडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो – जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या समवेत करुळ येथील ग्राम संरक्षक पथक. यावेळी उपस्थित पदाधिकारी छाया संजय शेळके वैभववाडी
