⚡कणकवली ता.२०-: ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले(वय ५२) यांचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.
नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले हे १९ जुलैला दुपारी ३ वाजता ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते.नदीच्या काठावर ओझरम येथे गळ टाकून मासेमारी करत असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पाय घसरून ते नदीच्या पाण्यात खाली कोसळले.त्याचा आवाज त्यांच्या सोबत असलेल्या हनिफ थोडगे यांना आला.त्यांनी त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढत रिक्षेने नांदगांव आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तिठा येथून शरफुद्दीन हे आपल्या मेहुणीचा पती हनिफ अहमदअली थोडगे(मूळ रा.गगनबावडा, सद्या राहणार नांदगाव)यांच्याबरोबर मंगळवारी दुपारी मासेमारीसाठी गळ घेऊन गेले होते. मात्र ओझरम येथील नदीच्या काठावर पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाला.त्यांना बेशुद्ध असताना पाण्याबाहेर हनिफ थोडगे यांनी काढत उपचारासाठी दाखल केले.मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शरफुद्दीन यांना मृत घोषित केले. शरफुद्दीन बटवाले यांच्या मृतदेहावर बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरफुद्दीन बटवाले यांचे नांदगाव तिठा येथे गेली अनेक वर्षे चहा,नाष्टाचे हॉटेल आहे.त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,आई ,वडील,भाऊ असा परिवार आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.
