कोरेगाव भीमा दंगल पुराव्यांची छेडछाड

भारत मुक्ती मोर्चा आक्रमक;राज्यपालांसाठी जिल्हा प्रशासनाकडे दिले निवेदन

⚡ओरोस ता.१८-: कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी आयोगासमोर पोलिसांनी पुरावे म्हणून दाखल केलेले व्हिडिओ, सीसीटिव्ही फुटेज छेडछाड करून सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने १८ जुलै पासून निषेध मालिका आंदोलन सुरू केले आहे. या अनुषंगाने राज्यपाल यांना देण्यासाठी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांना देण्यात आले.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा प्रभारी सगुण जाधव, के एम कदम, श्री जामसांडेकर, रुपेश जाधव, संघटनेचे बेरोजगार मोर्चा पदाधिकारी अनिकेत जाधव, संतोष जाधव, अंकित जाधव, प्रवीण जाधव, विद्यार्थी मोर्चा प्रतिनिधी अथांग जाधव, संदेश कांबळे, बेरोजगार मोर्चा पदाधिकारी सचिन जाधव आदी उपस्थित होते.
राज्यपाल यांच्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदनात, कोरेगाव भीमा येथील एसबीआय बँकेच्या सीसीटिव्हीमध्ये काही लोकांनी पिशवी सदृश्य एक वस्तू ठेवली. थोड्या वेळाने या वस्तूला आग लागली. मात्र, चौकशी आयोगासमोर जाळपोळ, दगडफेक करणाऱ्यांचे चेहरे स्पष्ट दिसू नयेत अशाप्रकारे हे फुटेज ब्लर करण्यात आलेले सादर करण्यात आले आहे. वढू बुद्रुक कोरेगाव भीमा रोडवरील झेड एफ कंपनीच्या गेटवरील १ जानेवारी २०१८ रोजीचे केवळ दोन मिनिटे ३७ सेकंदाचे फुटेज दिले गेले आहे. यामुळे घटनाक्रम समजत नाही. सबळ पुरावे देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहे.
त्यामुळे भारत मुक्ती मोर्चा यांच्यावतीने पूर्ण महाराष्ट्र भर निषेध मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज १८ रोजी धरणे प्रदर्शन करण्यात आले. २८ जुलै रोजी रॅली प्रदर्शन करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page