जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार
कणकवली १८ जुलै(प्रतिनिधी)-कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी बिनशेती मंजूर रेखांकन आदेशानुसार सोडलेला ६ मीटरचा रस्ता संबंधित मालकाने बंद केला आहे.त्या ठिकाणी इमारत बांधकाम करत नियमांचे उल्लंघन केले आहे.या अतिक्रमाविरोधात तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.सदर रस्ता कलमठ लांजेवाडी येथील नागरिकांना जाण्यासाठी बंद आहे.त्यामुळे कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री,पंचायत समिती सदस्य महेश लाड,उपसरपंच वैदेही गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सकाळपासून कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं आहे.
यावेळी स्वप्निल चिंदरकर, विजय चिंदरकर,संदीप मेस्त्री,राजू नारकर, रुपेश सावंत, संदेश सावंत, विलास गुडेकर, चंद्रशेखर हजारे, बाबू नारकर,विलास गुडेकर आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित आहेत.
याबाबत तहसीलदार कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बिनशेती आदेशाच्या अटी, शर्तीचा भंग करुन केलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्या बाबत २५ जानेवारी रोजी संबंधितांना तहसीलदार कार्यालयाकडून पत्र दिलेले होते. त्या तारखेपासून आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतकडे रोष व्यक्त केला आहे. १५ जुलै पर्यंत सदर अतिक्रमण दुर करण्याबाबत कारवाई न झाल्यास ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी नाईलाजास्तव ग्रामपंचायत कार्यकारणीला संबंधीत ग्रामस्थांसोबत आपल्या कार्यालयासमोर १८ जुलै पासून उपोषण छेडावे लागणार असा इशारा या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कणकवली प्रांताधिकारी किंवा कणकवली तहसीलदार आणि तातडीने या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार कलमठ ग्रामस्थांनी केला आहे.
