विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख वाढताच : सेवानिवृत्ती सत्कारावेळी मान्यवर बनले भावूक
⚡बांदा ता.१६-: कोरोना काळात शाळा बंद असताना घरोघरी जाऊन मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम मुख्याध्यापक गणपत केदार यांनी दिले. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना नोकरी किंवा व्यवसाय म्हणून काम न करता एक प्रकारची सेवा म्हणून त्यांनी काम केले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला असे भावोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.
आजी-माजी पालकांच्या विचारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंडित जवाहरलाल नेहरू आरोस मधील मुख्याध्यापक गणपत केदार यांच्या सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. व्यासपीठावर केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, माजी मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा मडुरकर, उपाध्यक्ष शेखर आरोलकर, माजी सरपंच संजू पांगम, आरोस सोसायटी व्हाईस चेअरमन योगेश नाईक, ग्रा.प.सदस्य निलेश आरोलकर, दांडेली तंटामुक्त समिती अध्यक्ष हेमंत कामत, शिक्षक प्रांजल कळसुलकर, पोलिस पाटील अनंत मालवणकर तसेच पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात शाळा बंद असताना श्री. केदार गुरुजींनी घरोघरी जाऊन मुलांना शिक्षण दिले. सर्व मुलांना एकाच वेळी शिकवण म्हणजे शिक्षकांची कसोटी लागते. नोकरी किंवा व्यवसाय म्हणून केदार सरांनी काम न करता सेवा केली, असे हेमंत कामत म्हणाले. केंद्रप्रमुख ठाकूर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख केदार गुरुजींनी वाढवला. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण देण्यात महत्त्वाचे योगदान आहे असे सांगत आत्ताचे विद्यार्थी उद्या मोठ्या पदावर विराजमान व्हावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी पालकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले.
आदर्श शिक्षकाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे केदार गुरुजी. शाळा जमीन नावावर करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे असे सांगत संजू पांगम यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आईवडिलांनंतर महत्त्वाचा गुरु म्हणजे शिक्षक. भावी पिढी घडविण्याचे काम केदार गुरुजींनी केले. मुलांची आवड ओळखून त्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मराठी शाळेत चांल्या दर्जाचे मिळते हे केदार गुरुजींनी आम्हाला दाखवून दिल्याचे योगेश नाईक यांनी सांगितले. माजी मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर तसेच पालकांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद कांबळे यांनी तर आभार कृष्णा मडुरकर यांनी मानले.
