सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम साटम यांना राज्यस्तरीय पुरस्कार

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने झाला सन्मान

वैभववाडी संजय शेळके
शिक्षण, सामाजिक आणि वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम आकाराम साटम यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण इचलकरंजी येथे पार पडले. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार, डॉ. सुमित्रा पाटील, प्रदेश महिला संघटक सुचेता कलाजे, प्राध्यापक श्री कुराडे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्ताराम साटम हे करूळ गावचे सुपुत्र आहेत. तालुक्यात ते साटम गुरुजी नावाने परिचित आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून अनेक वर्ष कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. वैभववाडी, कणकवली व गगनबावडा या तालुक्यात त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. शाळांचा १०० टक्के निकाल यात साटम गुरुजी यांचे योगदान आहे. शासनाचा अल्पबचत उपक्रम, कुटुंब कल्याण उपक्रम यात त्यांनी कामाचा ठसा उमटविला होता. दरम्यान त्यांना जिल्हा परिषदच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सन १९९६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या नंतर त्यांनी संपूर्ण काळ समाजासाठी झोकून देत काम केले. शिक्षण, समाजसेवा आणि वारकरी संप्रदायाचे सेवक म्हणून केलेल्या कामामुळे हा त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. समाज उन्नतीसाठी प्रयोगशील काम करणाऱ्यांचा आविष्कार फाउंडेशन नेहमीच सन्मान करत आली आहे.
श्री. साटम हे वारकरी संप्रदायात अनेक वर्ष कार्यरत आहेत. तालुक्यातून दरवर्षी जाणाऱ्या पायी वारीचे ते प्रतिनिधीत्व करत आहेत. वैभववाडी तालुका वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष आहेत. वैभववाडी तालुका नागरी पतसंस्थेचे ते व्हा. संचालक आहेत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र वारकरी महामंडळ वैभववाडी तालुका अध्यक्ष, रासाई देवी दूध संस्था करुळ व्हा. चेअरमन, वैभववाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना उपाध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम कदम, सेवानिवृत्त शिक्षक मनोहर साटम, यशवंत कोलते, हिराचंद कोलते, दीपक लाड, दाजी कोलते, मुख्याध्यापक नवनाथ सगरे, प्रकाश साटम, संदीप कोलते, भिकाजी कोलते, अनंत कोलते, साटम कुटुंबीय व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो – राजर्षी शाहू गौरव पुरस्कार स्वीकारताना दत्ताराम साटम. यावेळी उपस्थित मान्यवर व साटम कुटुंबीय.

You cannot copy content of this page