वीज समस्यांबाबत घेराव घालत विचारला जाब
बांदा
बांदा शहरात गेले महिनाभर वीजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना घेराव घालत जाब विचारला. ग्राहकांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात अभियंता कोहळे अपयशी ठरले. येत्या आठ दिवसात सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरीही चालतील असा गर्भित इशारा देण्यात आला. अमाप वीज बीले आकारता मग सेवा देताना कारणे कसली देता ? असा सवाल ग्राहकांनी केला.
बांदा शहरात वीजेची गंभीर समस्या आहे. वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. व्यापार्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. लेखी निवेदने देऊनही महावितरणच्या कार्यपद्धतीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अभियंता कोहळे यांना घेराव घातला.
जीर्ण वीज वाहिन्या व खांब, वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न करणे यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज बीले वसुलीची कामे कर्मचारी आवडीने करतात. मात्र वीजेच्या समस्या सोडविण्यात मात्र मागे असतात असा आरोप ग्रा. पं. सदस्य साई काणेकर यांनी केला. शहरापासून दीड कि. मी. अंतरावर महावितरणचे कार्यालय असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना फटका बसत आहे. सदर कार्यालय शहरातच असले पाहिजे अशी मागणी सदस्य जावेद खतीब यांनी केली.
यावेळी अधीक्षक अभियंता, सावंतवाडी उप अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल स्वीच अॉफ आल्याने ग्राहक आणखीनच संतप्त झाले. यावेळी अभियंता अनिल यादव उपस्थित नसल्याने सरमळे येथून आलेल्या ज्येष्ठ ग्राहकांना हात हलवित माघारी परतावे लागले. येत्या ८ दिवसात वीजेची परिस्थिती न सुधारल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. ग्राहकांच्या प्रश्नांवर अभियंता कोहळे निरुत्तर झाले होते. विनेश गवस यांनी वाफोलीतील वीज समस्या व वायरमनचा बेजबाबदारपणा याबाबत तक्रार केली.
यावेळी सरपंच अक्रम खान, सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, बाळू सावंत, शाम मांजरेकर, ज्ञानेश्वर सावंत, विनेश गवस, निखील मयेकर, निलेश देसाई, समीर सातार्डेकर, केदार कणबर्गी, नाना सावंत, प्रज्योत काणेकर, ओंकार नाडकर्णी, सचिन वीर, प्रथमेश गोवेकर, बिपीन येडवे, हेमंत दाभोलकर, प्रविण येडवे, अर्णव स्वार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
