तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचा विशेष पुढाकार
⚡कणकवली ता.१०-: दिवंगत जेष्ठ पत्रकार,लेखक,कवी,गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सोमवार ११ जुलै रोजी सकाळी ठीक ९ .३० वाजता तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयामध्ये नानिवडेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी “मधुस्मृती” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ,विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय,तळेरे आणि प्रज्ञांगण परिवार,संवाद परिवार-तळेरे व श्रावणी काॅम्प्यूटर,तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून नानिवडेकर यांचे जवळचे स्नेही माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी, कवी-लेखक प्रमोद कोयंडे हे उपस्थित राहणार आहेत.
स्व.मधुसुदन नानिवडेकर यांचे साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान आणि कवी,गझलकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला होता. तसेच रसिकांच्या मनामध्ये अधिराज्य मिळविले होते. अशा या महान व्यक्तीच्या अकाली जाण्याने साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. नानिवडेकर यांनी सुरू ठेवलेला वारसा यापुढे जोपासला जावा, नवीन पिढीसमोर त्यांचा आदर्श निर्माण होऊन नवनवीन कवी,गझलकार निर्माण व्हावेत यासाठी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने विशेष पुढाकार घेऊन त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपून अखंड स्मृती जागर सुरू ठेवून त्यांना अभिप्रेत असलेले कार्य पुढे नेण्याचे निश्चित केले आहे.
तरी या “मधुस्मृती” कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
