भंडारी समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत आजच्या पिढीने योगदान द्यावे…

भाई गोवेकर ; भंडारी समाजातील दहावी, बारावीतील गुणवंतांचा गुणगौरव…

⚡मालवण ता.१०-: सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या समाजातील विद्यार्थी टिकून राहणे आवश्यक आहे. यासाठी भंडारी समाजाच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन येत्या काळात विद्यार्थ्यांना देण्यासाठी मंडळाने प्रयत्न करावेत. समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत आजच्या पिढीने आपले योगदान द्यायला हवे असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ ज्ञाती बांधव भाई गोवेकर यांनी मालवण येथे केले.

मालवण येथील सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने आज भरड येथील हॉटेल लीलांजली येथे भंडारी समाजातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ ज्ञाती बांधव भाई गोवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, सुनील नाईक, राजू आंबेरकर, पंकज पेडणेकर, जयमाला मयेकर, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, यशवंत वेंगुर्लेकर, मोहन वराडकर, रमण वाईरकर, प्रदीप वेंगुर्लेकर, यजुर्वेद हडकर, बाबल कवटकर, बाबू परुळेकर, अरुण दुधवडकर, सचिन आरोलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, ज्ञाती बांधव उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या वतीने समाजातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. गोवेकर म्हणाले, भंडारी समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकण्यासाठी भंडारी समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणे गरजेचे आहे. यासाठी भंडारी मंडळाने तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मंडळाने एक टीम तयार करून अशा विद्यार्थ्यांना कागदपत्रे तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या विद्यार्थ्यांना समस्या भेडसावत आहेत त्यांनी भंडारी समाज मंडळाशी संपर्क साधल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी अशोक कांबळी, संजय जाधव, ममता वराडकर यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अपूर्वा तळाशीलकर हिने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती या विषयी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. रवी तळाशीलकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page