⚡मालवण ता.०९-: मालवण कसाल राज्यमार्गावरील मालवण देऊळवाडा ते आणि कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या सीमेपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
देऊळवाडा ते कुंभारमाठ हा रास्ता जरीमरी घाटीतून जात असल्याने हा रस्ता चढाव व उताराचा तसेच धोकादायक वळणांचा आहे. देऊळवाडा येथे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच मालवणहून कुंभारमाठच्या दिशेने असलेल्या चढावावरील वळणारच रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या डाव्या बाजुला बरीचशी खडी रस्त्यावरच साचून आहे. तसेच कुंभारमाठ जरीमरी मंदिराच्या नजीक या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील ही धोकादायक स्थिती तसेच खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात समोरासमोर येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे बुजवून डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांमधून होत आहे.
