⚡मालवण ता.०८-: हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मालवण तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार १२ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मालवण तालुक्यातील खाडी व समुद्र किनारी भागातील लोकांनी सतर्क राहून खबरदारी घेण्याच्या सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील २२४ कुटुंबांना खबरदारी म्हणून स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहितीही तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.
गेले तीन दिवस मुसळधार पावसाने मालवण तालुक्याला झोडपून काढले असून आजही दिवसभर पावसाने आपली संततधार सुरू ठेवली होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मालवणात १७० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली तर मालवणात आतापर्यंत १९७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यातील पळसंब येथील बापूजी जुवेकर यांचे राहते घर व सुभाष तर्फे यांचा कौलारू शेत मांगर कोसळल्याची घटना घडली आहे. सरपंच चंद्रकांत गोलतकर व तलाठी वैशाली कदम यांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. पंचनाम्यानुसार बापूजी जुवेकर यांच्या घराचे अंदाजे ४६ हजार रुपये तर सुभाष तर्फे यांचे १७ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त जुवेकर व तर्फे कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच गोलतकर यांनी केली आहे. तर पराड येथील भगवान राजाराम पाटकर यांच्या घराची पडवी कोसळून २४०० रु. चे नुकसान झाले. तर ओवळीये येथील सुमती मधुकर निर्गुण यांच्या घराच्या छप्परावर झाड पडून नुकसान झाले.
प्रादेशिक हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा तसेच या दरम्यान किनारपट्टी भागात ४५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टी भागात समुद्राच्या साडे चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, खाडी व समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही हवामान विभागाने केले असल्याची माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. तसेच पावसामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती अथवा समस्या निर्माण झाल्यास मालवण तहसील कार्यालय कंट्रोल रूम – ०२३६५-२५२०४५ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार पाटणे यांनी केले आहे.
