माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य;आ वैभव नाईक यांचा पाठपुरावा
मालवण
मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्री. सुभाष सीताराम मेस्त्री यांना गँगरीनच्या आजारामुळे पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात ७ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याने याबाबत आम. वैभव नाईक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ठाकरे यांच्या आदेशानुसार हिंदुजा रुग्णालयात मेस्त्री यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. मोफत शस्त्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आम. वैभव नाईक यांचे मेस्त्री कुटुंबीयांनी आभार मानले.
तिरवडे येथील सुभाष मेस्त्री यांना त्यांच्या पायाच्या आजाराबाबत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्या नंतर श्री. मेस्त्री यांना आम. वैभव नाईक यांनी हिंदुजा रुग्णालय येथे दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी या शास्त्रक्रिये करिता एकूण ७ लाख एवढा अंदाजित खर्च असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. शस्त्रक्रियासाठी एवढा खर्च करणे श्री. मेस्त्री व कुटुंबियांना यांना शक्य नव्हते. याबाबत आम. वैभव नाईक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे श्री. मेस्त्री यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देऊन सदर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून देण्याची मागणी केली होती. आम. वैभव नाईक यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सात लाख रुपये खर्च असलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याचे आदेश हिंदुजा रुग्णालयास दिल्यानंतर मेस्त्री यांचे पायाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया मोफत करून मेस्त्री कुटुंबियांना यामधून यशस्वीरित्या बाहेर काढण्याकरिता सहकार्य केल्याने मेस्त्री कुटुंबीयांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. तर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. मेस्त्री यांच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करून मोफत शस्त्रक्रिया करण्याचे हिंदुजा रुग्णालयास आदेश दिल्याने आम. वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
