आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी केला वर्ग
⚡मालवण ता.०७-: विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे आचरा येथील कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रु.चे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. आम. वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीचे आचरा उपविभाग येथे कार्यरत असणारे कंत्राटी वायरमन व आचरा, वरचीवाडी येथील रहिवासी आनंद कृष्णा मिराशी (वय २२) हे विद्युत पोलवर वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. यामुळे मिराशी कुटुंबावर मोठे संकट ओढवले. मिराशी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची असल्याने मिराशी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी आम. वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मानवतावादी दृष्टिकोनातून एक विशेष बाब म्हणून १ लाख रु. एवढे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. हे आर्थिक सहाय्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले असून त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. लवकरच सदर रकमेचा धनादेश आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. या निधीबद्दल उद्धव ठाकरे, ना. एकनाथ शिंदे यांचे आम. नाईक यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान मिराशी कुटुंबियांना आचरा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निधी मंजुरीचे पत्र दिले. यावेळी शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, आचरा विभाग संघटक चंदु गोलतकर, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक परब, आचरा उपविभाग प्रमुख जगदीश पांगे, शहर प्रमुख राजु नार्वेकर, आचरा मच्छीमार नेते नारायण कुबल, आचरा माजी सरपंच शाम घाडी, माजी सरपंच चंदन पांगे, नरेश तारकर, निलेश गावडे,सलमान मुजावर आदी उपस्थित होते.
