वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
वेंगुर्ले नगरपरीषद हद्दीत रा. कृ. पाटकर हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनाथाश्रमाच्या कंपाऊंटमध्ये असलेले जुनाट भला मोठा आम्रवृक्ष अखेर नगरपरीषेदेने धोकादायक असल्याचे पाहून आज बुधवारी तोडल्याने नागरीक, विद्यार्थी, पालक व हायस्कुलचे शिक्षक यांच्यातील वृक्षाबद्दलची भिती दूर झाली.
दरम्यान, सदरच्या धोकादायक आम्रवृक्षाबाबत वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी व वेंगुर्ले तहसिलदार यांना तो वृक्ष त्वरीत तोडून नागरीक व विद्यार्थी यांच्या मनातील भिती दूर करावी. कारण त्यामुळे नागरीक व विद्यार्थीच्या जिवीतांस धोका असल्याने ते त्वरीत तोडण्याची मागणी केली होती. सदरचे झाड दोन दिवसांत न तोडल्यास मुख्याधिकारी यांना नागरीक, विद्यार्थी वर्गातर्फे घेराव झालण्याचा ईशाराही दिला होता.
वेंगुर्ले नगरपरीषद हद्दीत रा. कृ. पाटकर हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनाथाश्रमाच्या कंपाऊंटमध्ये असलेले जुनाट व जीर्ण आंब्याचे झाड हे मुख्य रस्त्यावरून व रा. कृ. पाटकर हायस्कुलमध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या शाळकरी विद्यार्थी तसेच शहरातील नागरीक यांच्यावर मोडून पडून गंभीर प्रसंगी उदभवू शकतो. असा प्रसंग तेथे साफसफाई करणाऱ्या नगरपरीषद सफाई कर्मचाऱ्यांना चार दिवसांत आलेला होता, पण दैव बलवंतर म्हणून ते वाचले. त्यामुळे सदरचा आम्रवृक्ष नगरपरीषदेने किंवा तहसिलदार यांनी तातडीने तोडून भविष्यात घडणारा अनर्थ टाळावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांचेसह नागरीकांतून करण्यांत आली होती.
गेल्या दोन दिवसांपूर्वी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारांस अनाथाश्रमातील ते जुनाट व जीर्ण मोठय़ा आंबा झाडाची मोठी फांदी मोडून रा. कृ. पाटकर हायस्कुलकडे जाणाऱ्या रोडवर, मुख्यरस्त्यापासून 20 फुट अंतरावर अकस्मित पडली. यात नगरपरीषदेचे कर्मचारी दैव बलवंतर म्हणून वाचले. तर पाटकर हायस्कुलमध्ये टुव्हीलरने जाणाऱया पालकाच्या गाडीवर पडले. ते सुध्दा दैव बलवंतर म्हणून वाचले. हि घटना घडल्यानंतर शहरातील अनेक नागरीकांनी तसेच विद्यार्थी व पालकांनी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून सदरचे धोकादायक आंब्याची झाड तोडून धोका टाळण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे व वेंगुर्ले तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे केली होती. तसेच या धोकादायक वृक्षामुळे कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी पूर्णपणे नगरपरीषदेवर राहिल असेही स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वी नगरपरीषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर काम करताना ओढावलेली घटना ताजी असताना सदरचे धोकादायक झाड नगरपरीषदेने विद्यार्थी, पालक व नागरीकांच्या जिवीताच्या दृष्टीने महत्वाची असल्याने नगरपरीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी त्याची दखल घेत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारांस ते धोकादायक झाड तोडण्याची प्रक्रिया राबविली. यावेळी माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेविका, सुमन निकम, श्रेया मयेकर यांचे बरोबरच नगरपरीषदेचे अधिकारी वैभव म्हाकवेकर, कर्मचारी शैलेंद्र सातार्डेकर, भाऊ कुबल, हेमंत चव्हाण, संतोष चव्हाण, पंकज पाटणकर, किरण जाधव, सुरेश जाधव, देवेंद्र जाधव यांनी सदरचे झाड तोडीपर्यत दाभोली नाका ते भुजनाकवाडी रस्ता एवढा भाग वाहातुकिसाठी बंद केला होता. हे झाड तोडण्याचे काम चेंदवणकर यांना देण्यात आले होते. त्यासाठी सावंतवाडी नगररीषदेची क्रेनही आणण्यात आली होती.
