ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर व्यक्त केला रोष
⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी घेत आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. नाईक यांनी शहरात गटार खोदाईचे काम घेतलेल्या नाशिकच्या ठेकेदाराला जाब विचारत खडे बोल सुनावले. यावेळी आमदार नाईक यांच्या रोषाला मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनाही सामोरे जावे लागले. यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला पाच लाख रुपयाहुन अधिक रक्कम बिलापोटी देण्यात आल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणताच ठेकेदाराने गटार खोदाई समाधानकारक न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी असे सूचनावजा आदेश आमदारांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे मालवण शहर जलमय झाले. शहरातील प्रत्येक भागात पाण्याचा योग्य रीतीने निचरा न झाल्याने पाणी साठण्याचे प्रमाणही वाढले. पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाचा प्रश्न ऐरणीवर आला. याबाबत मालवण शहर वासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर माजी खासदार निलेश राणे यांनी गटार खोदाई प्रश्नी मालवण नगरपालिकेला धडक देण्याचा इशाराही दिला होता. एकूणच मालवणच्या गटार खोदाईचा प्रश्न नागरिकांबरोबरच राजकीय पटलावर लक्षवेधी ठरला. या पार्श्वभूमीवर आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. वैभव नाईक यांनी मालवण शहरातील ठिकठिकाणी पाणी साचलेल्या भागांची मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि संबंधित ठेकेदार यांच्या समवेत शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भर पावसात पाहणी केली.
यावेळी आमदार नाईक यांच्याकडे शिवसैनिकांनी गटार खोदाईबद्दल तक्रारी केल्या. यामुळे आमदारांनी एसटी स्टॅण्ड परिसरातील गटार खोदाई पाहण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला कल्पना देवून ठेकेदारालाही त्याठिकाणी बोलाविले. ठेकेदार कामगारांचे रजिस्टर घेऊन आल्यानंतर आमदारांनी आक्रमकपणे त्याच्या हातातील रजिस्टर काढून घेत रजिस्टर दाखवू नकोस प्रत्यक्षात कामगार किती आणलेस आणि कार्यरत किती आहेत? असे विचारले. यावर त्याने आपण नाशिक येथून एकही कामगार आणलेला नसल्याचे स्पष्ट केले. कामगार नसताना ठेका भरलाच कसा? असे आमदारांनी विचारात त्याला खडे बोल सुनावले.
मालवण शहरातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदारांनी करताना येत्या दोन दिवसात शहरातील शिल्लक राहिलेल्या गटारांची खोदाई करण्याची सूचना केली. तसेच मालवण तालुक्यातील स्थानिक कामगार सदरच्या ठेकेदाराकडे कार्यरत असताना त्यांना पगार देण्यात आलेला नसल्याचे आमदारांना समजताच त्यांनी ठेकेदाराला कामगारांचे पगार देण्याच्या सूचना केल्या. तसेच मिळालेल्या बिलाचे पैसे कामगारांना न देता अन्य कोणाला दिलेस काय? असाही सवाल उपस्थित केला. मालवणातील काम अर्धवट राहिल्यास राज्यात कुठेही काम करण्यास देणार नसल्याचाही इशारा आमदार नाईक यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नुतन बांधकाममुळे अर्धवट असलेल्या स्थितीतील एसटी स्टॅण्ड परिसरातील सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल आमदारांनी पाहणी केली. यावेळी एसटी स्टॅण्ड परिसरातील शौचालयाच्या टाकीचे सांडपाणी गटारातून बाहेर येत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासनाला सूचना करून नागरिकांना त्रास होत असेल तर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. यावेळी एसटी बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याचेही आमदारांच्या निर्दशनास आले आहे.
दरम्यान, आमदार नाईक यांनी यावेळी शहरातील गटार खोदाईवर नाराजी व्यक्त करत गतवर्षी तोक्ते चक्रिवादळ आलेले असतानाही गटार खोदाई समाधानकारक झालेली असताना स्थानिक ठेकेदाराला बाजूला ठेवून नाशिक येथून आलेल्या ठेकेदाराला ठेका देण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदविला. तसेच संबंधित ठेकेदाराकडे मालवण शहरातील कचरा उठाव करण्याचाही ठेका असल्याचे शिवसेना पदाधिकारी यांनी सांगताच जर कामगार नसतील तर ठेकेदाराला ठेका दिलाच कसा? असा सवाल आमदारांनी पालिका प्रशासनाला विचारला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, महेंद्र म्हाडगुत तपस्वी मयेकर, किरण वाळके, स्वप्नील आचरेकर, सन्मेष परब, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर, दिलीप घारे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
