ट्रक – मोटरसायकल अपघातात मोटरसायकल चालक जखमी

बांदा – पानवळ येथील घटना

⚡बांदा ता.०६-: बांदा – पानवळ येथील गोगटे – वाळके महाविद्यालयासमोर ट्रक व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. नरेशकुमार गिरिधारीलाल ज्योतिषी (३५, रा. राजस्थान, सध्या रा. बांदा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बांदा पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, नरेशकुमार हा मोटरसायकलने (एमएच ०७ एडी ३०३८) आज दुपारी दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने येत होता. पानवळ कॉलेज समोर बांद्याहून मोरगावकडे कोंबडी खाद्य घेऊन जाणार्‍या ट्रकशी (एमएच ०७ सी ६७०१) त्याची जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रकला आदळून तो रस्त्यावर कोसळला. स्थानिकांनी त्याला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. नरेशकुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून २२ टाके पडले आहेत. त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, काँस्टेबल विठोबा सावंत, दिप्ती गवस यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघाताची फिर्याद ट्रकचालक आनंदराव आप्पा माने (३४, रा. जत, सांगली) याने दिली असून मोटरसायकल चालक नरेशकुमार ज्योतिषी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page