कचरा व खड्ड्यांमुळे सागरी महामार्गाची दुरावस्था; भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा

⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील रेवतळे सागरी मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर कचरा असून यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आरोग्यास तसेच सागरी मार्गाच्या दुतर्फा असलेल्या पाणथळ भागातील कांदळवनालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्यावर खड्डेही मोठ्या प्रमाणावर पडले असून यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून न.प. प्रशासनाने येथील कचऱ्याच्या समस्येवर योग्य ती कार्यवाही करावी तसेच खड्डे बुजवावेत, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे मालवण शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी करीत नगरपालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मालवण शहरातील रेवतळे येथील सागरी महामार्गची भाजप युवामोर्चा चे शहराध्यक्ष ललित चव्हाण व सहकाऱ्यांनी करत कचरा व खड्ड्यांमुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी निनाद बादेकर, राजा मांजरेकर, बाबू शिंदे, संकेत जाधव, शुभम लुडबे, अनिल मुणगेकर आदी उपस्थित होते.

सागरी महामार्ग येथे बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक व इतर विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे. हा टाकलेला कचरा भटकी जनावरे, कुत्रे रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या परिसरात आणून दुर्गंधी करत आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने हा कचरा आरोग्यास धोकादायक आहे. कचऱ्यामुळे तेथील पाणथळ भागातील कांदळवनाला देखील धोका निर्माण झाला आहे. मात्र याठिकाणी नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही. नगरपालिकेने याठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी व कचरागाडीची फेरी सुध्दा नियमित ठेवावी. या भागाची स्वच्छता करतानाच कचरा टाकण्यास निर्बंध करण्याबाबत नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी, न केल्यास भाजपा युवा मोर्चा तर्फे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा ललित चव्हाण यांनी दिला.

तसेच कवटकर दुकान ते कोळंब हा सागरी महामार्ग खड्डेमय झाला आहे. पावसामुळे त्याची अवस्था अजून बिकट झाली आहे. याठिकाणी छोटे मोठे अपघात होत असून पादचारी व दुचाकीस्वारांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. या मार्गावर भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास यासाठी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. रेवतळे भागातील रस्ते लाईट सुध्दा मागील एक आठवडा बंद आहेत. तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीच हालचाल नाही. यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली असून याबाबत लवकरच मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात येणार आहे, असेही ललित चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page