मालवणात पर्यटन वाढीसाठी रोटरी क्लब विशेष उपक्रम राबविणार

रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष रो. रतन पांगे ,सेक्रेटरी रो अभय कदम यांची माहिती

⚡मालवण ता.०५-: आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करून जनमाणसात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रोटरी क्लबने मालवण मध्येही विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आगामी वर्षात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान, समरगीत व वक्तृत्व स्पर्धा या आणि अशा पद्धतीचे विविध उपक्रम राबविताना जिल्ह्याचे पर्यटन शहर म्हणून नावारूपाला आलेल्या मालवणला येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य पर्यटन व्यावसायिकांनी कसे करावे, ज्या योगे मालवणच्या पर्यटन व्यवसायात अधिक उर्जितावस्था कशी येईल याविषयीचे मार्गदर्शनपर शिबीर घेण्याचा मनोदय रोटरी क्लब ऑफ मालवणचे नूतन अध्यक्ष रो. रतन पांगे आणि सेक्रेटरी अभय कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ मालवणच्या २०२२ – २३ या वर्षासाठी अध्यक्ष पदी रतन पांगे व सचिव म्हणून अभय कदम तर खजिनदार म्हणून रमाकांत वाक्कर यांच्यासह कार्यकारी संचालक मंडळ निवडण्यात आले असून त्याचा पद्ग्रहण समारंभ ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी- सॅफरॉन येथे रोटरीचे डि जी ई नसीरभाई बोरसाडवाला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभा विषयी तसेच रोटरी क्लब मालवणच्या आगामी वाटचालीबाबत माहिती देण्यासाठी मालवण येथील हॉटेल स्वामी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब मालवणचे मावळते अध्यक्ष उमेश सांगोडकर, रमाकांत वाक्कर, ऋषी पेणकर, महादेव पाटकर, संजय गावडे, राजन तांबे, संदेश पवार, महेश काळसेकर, राजेश पारधी आदी उपस्थित होते. प्रारंभी मावळते अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी गतवर्षी केलेल्या कामाची माहिती देत सर्वांचे आभार मानले.

यावेळी बोलताना श्री. महादेव पाटकर म्हणाले, यावर्षी २०२२- २३ साठी मालवण रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून या निवडीनंतर सुरुवातीलाच आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. यानंतर स्वच्छता अभियान, अंध बांधवांचा स्नेहमेळावा, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, शासनामार्फत वर्षातून दोन वेळा होणाऱ्या पोलिओ डोस बाबत जनजागृती करण्याची मोहीम घेण्यात येणार असून गुरूपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत माहिती देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असे सांगून आज ठिकठिकाणी पाककला स्पर्धा घेण्यात येते, मात्र यावर्षी रोटरी क्लब मालवण तर्फे ऑन दि स्पॉट पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात स्पर्धकाला रोटरी क्लब मार्फत साहित्य दिले जाणार असून स्पर्धा स्थळी स्पर्धकाने पाककला सादर करायची आहे. त्याच प्रमाणे मालवणच्या फातिमा कॉन्व्हेंट मध्येही दिवाळी फराळ वाटप करण्यात येणार असून आरोग्य, नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय मालवण मधील शाळांच्या ग्रंथालयांसाठी पुस्तके दिली जाणार असून मॅरेथॉन, जिल्हास्तरीय बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक उपचाराबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून हॅप्पी स्कुल संकल्पना, कर विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.

यावेळी रो रतन पांगे यांनी आज मालवण शहरात ओला कचरा, मोठ्या प्रमाणात आढळत असून त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने आणि खतनिर्मिती करण्यासाठी काय करता येईल याबाबत ठोस मार्गदर्शन केले जाणार आहे. मालवण तालुक्यात एप्रिल मे महिन्यात ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आढळते त्याठिकाणी रोटरी क्लब मालवणतर्फे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून पर्यटनात्मक दृष्ट्या हॉटेल व्यावसायिकांना विशेष मार्गदर्शन करतानाच पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे यावेळी रो पांगे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page