भडका उडाल्याने टँकर जळून खाक; सुदैवाने चालक आणि क्लिनर वाचला…
मालवण (प्रतिनिधी)
सांगलीहुन चौके मालवण येथील भगवती पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल घेऊन येणाऱ्या भगवती पेट्रोल पंपाचा टँकर (एम.एच. ०७ पी १२१२) शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सावरवाड येथील गणेश मंदिरनजीक आला असता अचानक मागील चाकाचा टायर फुटल्याने टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात टँकर मधील डिझेल पेट्रोलचा भडका उडून टँकर जळून खाक झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने टँकरच्या चालक व क्लिनरने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते बालबाल वाचले.
या संबंधीचे अधिक वृत्त असे की चौके येथील भगवती पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा टँकर (क्र.- एम. एच. ०७ पी- १२१२) सांगलीहून चौके येथे पेट्रोल आणि डिझेल घेऊन येत असताना मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कसाल – मालवण मार्गावर सावरवाड गणेश मंदिर येथे या टँकरला अपघात झाला. हा टँकर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी टँकर मध्ये सहा हजार लिटर पेट्रोल व सहा हजार लिटर डिझेल असल्याने शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला व टँकरने पेट घेतला. यावेळी मोठा स्फोट झाल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. स्फोट होण्याच्या अगोदरच चालक व क्लिनर हे टँकर मधून बाहेर पडल्याने ते सुदैवाने बचावले. या अपघातात टँकर चालक सुमित सर्जेराव गायकवाड (रा. सांगली) याच्या पायास दुखापत झाली आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आग भडकत राहिल्याने स्थानिक नागरिकांना या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले. मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब उपलब्ध न झाल्याने कुडाळ एमआयडीसी येथून अग्निशमन गाड्या बोलविण्यात आल्या. मात्र तोपर्यंत टँकर जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे कसाल- मालवण मार्गावरील वाहतुकही बराच काळ ठप्प झाली होती.
दरम्यान, या अपघाताबाबत मालवण पोलीस स्थानकात टँकर मधील क्लिनर रोहित राजेंद्र कोकाटे (पलूस, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हयगयीने टँकर चालवून अपघात घडल्याप्रकरणी चालक सुमित सर्जेराव गायकवाड (वय ३१, रा. दत्तनगर थळावी, तासगाव सांगली) याच्यावर भा.द.वि. कलम २७९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.
