गवारेड्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा शेतकऱ्यांची मागणी
बांदा : विलवडे येथील शेतकरी श्रीराम अकुंश सावंत यांच्या मळावाडी मधील केळी बागायतीचे गव्यारेड्यांच्या कळपाने पुर्णता: नासधूस करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे सदर बागायती ही जमिनदोस्त झाली. विक्रि साठी योग्य झालेली केळी गव्यारेड्याने खाऊन फस्त केल्याने सावंत यांचे सुमारे १ लाख ५० हजारांचे नुकसान केले. वनविभाग व कृषी विभागाकडून गव्यारेड्याकडून होणाऱ्या नुकसानीचे कागदोपत्री पंचनामे केले जातात पण त्याची नुकसान भरपाई वेळत मिळत नाही. गेले आठ दिवस संबधित विभागाला कळवूनही संबधित विभागांकडून साधी पहाणी देखील करण्यात आली नसल्याचे सावंत यांनी सांगितले. गव्यारेड्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत असताना संबधित विभागा दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. विलवडे कृषी प्रधान गावात गव्यारेड्यांच्या नेहमीच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. अशा उपद्रवामुळे शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा चालवावा या चिंतेत आहे. केळी बागायती बरोबरोच इतर पिकांचे नासधूस होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शेतकरी शेती बागायती पासून दुरावत चालला आहे. आधीच कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना या संकटातून बाहेर पडत मोठ्या उमेदीने आपली विविध पिके घेत बागायती फुलवली आहे. परंतु बागायती डोळ्यादेखत गवेरेडे नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. आठ दिवसापुर्वी गव्यारेड्यांनी अर्धी बागायतीचे नुकसान केले होते. तर सोमवारी रात्री उशीरा सावंत यांच्या केऴी बागायतीत तयार झालेले केळीचे घड गव्या रेड्याच्या कळपाने पुर्णता: जमिनदोस्त केलेत. यामध्ये विक्रीस योग्य असणारे सुमारे २५० केळीचे घड तसेच लहान रोप २५० असे मिळुन सुमारे १ लाख ५० रुपायांचे नुकसान झाल्याचे सावंत यांनी सांगितले. त्यांच्या बाजूला असलेल्या पाच काजू कलमांचेही नुकसान केले. केळी बागायतीचे झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे न केल्यास मनसे तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली बांदा वनविभाग कार्यलयात धडक मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचा इशारा शेतकरी श्रीराम सावंत यांनी दिला आहे.
