⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील शिरसाट हेळेवाडी येथील पूरक नळयोजेची विहीर कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच या योजनेतून परिसरातील कुटुंबांचा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण विहीर कोसळली आहे. गावातील शिरसाटवाडी आणि वरचीवाडी परिसरासाठी काही वर्षा पूर्वी नळयोजना तयार करण्यात आली होती. यासाठी करंजगाळी या शेतामध्ये विहीर खोदण्यात आली होती. तीन-चार वर्षापासून ही विहीर कोसळण्याच्या स्थितीत होती.
याबाबत स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली. विहिरीची दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंच यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, या विहिरीचे दुरुस्तीचे काम वेळीच झाले नाही. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे ही पाठपुरावा करण्यात आला. तरीही विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आला. परिणामी मुसळधार पावसामध्ये संपूर्ण विहीचीचा भाग कोसळला आहे. यामुळे परिसरातील कुटुंबांना पाणी उपलब्ध होत नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असे निवेदन लवू पवार यांनी प्रशासनाला दिले आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांनकडे तक्रार करून लक्ष वेधले जाणार असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
