Headlines

पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गायब प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा…

शिवसेना नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जानेवारी २०२६ पासूनच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी..

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर गायब केल्याप्रकरणी व या विभागातील झालेल्या आर्थिक घोटाळ्या संबंधित उच्चस्तरीय, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील महत्वाचे वस्तू नोंद व वापर रजिस्टर गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या संपूर्ण कारवाईतील विरोधाभास आणि नगरपालिकेची संशयास्पद भूमिका अत्यंत चिंताजनक आहे. जनतेच्या कष्टाचा आणि कराचा हा निधी जनतेच्याच हितासाठी व सार्वजनिक कामासाठी वापरला जाणे बंधनकारक आहे. परंतु, अशा प्रकारे शासकीय दस्तऐवज आणि वस्तू नोंद रजिस्टर गायब होणे हा मोठा आर्थिक व प्रशासनिक घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने जिल्हास्तरावर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. या प्रकरणाची सविभागीय चौकशी करण्यात सहाय्यक आयुक्त यांना या चौकशी प्रक्रियेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात यावे. ते सध्या सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्याच्या प्रभावाशिवाय निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. जानेवारी २०२६ पासूनच्या काळातील या विभागातील आर्थिक घोटाळे झालेले आहेत त्या प्रत्येक व्यवहाराची आणि संबंधित प्रत्येकाची कठोर चौकशी करण्यात यावी. यात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची कसूर न ठेवता तिच्यावर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. हा जनतेचा पैसा असून त्याचा अपहार किंवा गैरवापर रोखण्यासाठी दोषींवर कडक व अद्दल घडवणारी कारवाई व्हावी. कोणताही पक्षपात न करता, आम्हाला व जनतेला न्याय मिळेल अशा पद्धतीने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे‌. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page